सातारा : दुकानात बिस्कीट पुडा आणायला गेल्यानंतर 6 वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सलीम ऊर्फ सलम्या गफूर मंडे (वय 19, रा.प्रतापसिंहनगर झोपडपट्टी, सातारा) याला विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.के.पटणी यांनी 5 वर्षांची शिक्षा ठोठावली.
अधिक माहिती अशी, ही घटना 2019 साली सातारा परिसरात घडली होती. पीडित मुलगी कुटुंबीयांसोबत दुसर्या जिल्ह्यात राहत आहे. सणानिमित्त ते सातार्यात आले होते. यावेळी मुलगी बिस्कीट पुडा आणायला गेल्यानंतर सलीम मंडे याने मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिला बाजूला नेले. शेडमध्ये मुलीवर अत्याचार केले व याबाबत कोणाला सांगितल्यास मारण्याची धमकी दिली. तोपर्यंत कुटुंबियांनी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मुलगी घराकडे आल्यानंतर घाबरलेली होती. कुटुंबियांनी तिला विश्वासात घेवून विचारल्यानंतर तिने घडलेल्या घटनेबाबत माहिती सांगून सलीम मंडेचे नाव घेतले.
शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे जे.एस. दिवाकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी सलीम मंडे याला 5 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात 4 साक्षीदार तपासण्यात आले. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस अविनाश पवार, अजित फरांदे यांनी सहकार्य केेले.