नंदुरबार: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर यांच्यावर पैशांच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे.
बरवानी पोलिसांनी (Police) मेधा पाटकर आणि त्यांच्या एनजीओच्या ११ जणांविरुद्ध पैशांच्या गैरव्यवहारप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. नर्मदाच्या नवनिर्माण अभियान स्वयंसेवी संस्थेने ८४ सामाजिक कार्ये आणि आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केलेल्या रकमेचा गैरवापर केल्याचा आरोप मेधा पाटकर यांच्यावर आहे. ती रक्कम विकास प्रकल्पांमध्ये वापरण्याऐवजी विरोधासाठी वापरली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या स्वयंसेवी संस्थेला गेल्या वर्षांत १३ ते १४ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे, तर यासंदर्भात उत्पन्न आणि खर्चाच्या स्रोतांबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. याप्रकरणी प्रीतम बडोले या तरुणाने एफआयआर दाखल केला आहे. “महाराष्ट्रातील नंदुरबार भागात जीवनशाळा नावाची शाळा चालवून मुलांचे भविष्य घडवण्याचे एनजीओला सांगण्यात आले होते, पण प्रत्यक्षात अशी कोणतीही शाळा दिसली नाही, म्हणजे शाळेच्या नावावर मेधा पाटकर आणि त्यांचे सहकारी पैसे उकळत आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि वातावरण बिघडवण्यासाठी ते पैशाचा वापर करत आहेत, असा आरोप तक्रारदार प्रीतम बडोले यांनी केला आहे.
प्रकरणी पोलिसांनी (Police) तपास सुरू केला आहे. स्वतंत्र टीम मुंबई, नंदुरबारला पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकरणी मध्यप्रदेश राज्यातील बडवानी येथील नर्मदा बचाव आंदोलन कार्यालयाला नोटीस बजावण्यात आली आहे. नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यासह ११ जणांवर जीवन शाळांच्या नावावर १३ कोटींहून अधिक रक्कमेचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कोतवाली पोलीस स्टेशन बडवानी येथे दाखल केलेल्या एफआयआरच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून, यामध्ये पोलीस विभागीय अधिकारी रुपरेखा यादव नेतृत्व करत आहेत.