लातूर : मराठवाड्यात उन्हाच्या झळा ह्या वाढत आहे. गेल्या आठ दिवसांपासून तर जिल्ह्याचा पारा 40 शी पार गेला आहे. अशाच रखरखत्या उन्हामध्ये निलंगा-औसा मार्गावरील वाघोली पाटीजवळ भर दुपारीच धावत्या कारने पेट घेतला
अचानक झालेल्या या प्रकरामुळे बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, या कारमधून तिघेजण प्रवास करीत होते. मात्र, कारला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात येताच गाडी थांबवून तिघेही बाहेर पडले. इंजिनच्या आजू-बाजूला असलेल्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या घटनेत प्रसंगवधान दाखविल्याने कोणीही जखमी झाले नाही.
रविवारी भर दुपारी मारुतीची स्विफ्ट डिझायर या चारचाकीतून तिघेजण हे निलंग्याहून लातूरकडे निघाले होते. दरम्यान, कार ही वाघोली पाटीजवळ येताच अचानक पेट घेतला. वाढते ऊन आणि इंजिन जवळील शॉर्टसर्किटमुळेच हे झाल्याचा अंदाज आहे. मात्र, गाडीच्या इंजिनने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी बाजूला घेतली आणि गाडीतील तिघेही बाहेर आले. यामध्ये सर्वजण सुखरुप असले तरी गाडीचे मात्र, मोठे नुकसान झाले आहे. शिवाय गाडीमध्ये अग्निशमनाचे कसलेही साहित्य नसल्याने कारला लागलेली आग विझवण्यात यश आले नाही .