धुळे : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आजचा दौरा धुळे, नंदुरबारसाठी लाभदायी ठरला. या जिल्ह्यातील खासदार, आमदारांच्या मागण्या मान्य करीत या कामांसाठी गडकरी यांनी १२ हजार कोटींचा निधी उपलब्ध करू, अशी ग्वाही दिली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिरात सकाळी अकराला कार्यक्रम झाला. त्यात धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील १८०० कोटींच्या निधीतील विविध रस्ते, महामार्गासंबंधी कामांचे ऑनलाईन भूमीपूजन, लोकार्पण, आणि कार्यारंभ मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाला.
यावेळी आमदार अमरिशभाई पटेल यांनी रस्ते विस्तारीकरण व विकासात प्रत्येक शंभर किलोमीटरला बीओटी तत्त्वावर पुरूष, महिला, बालकांसाठी प्रसाधनगृहे उभारावीत, अशी मागणी केली. तसेच आदिवासीबहुल भागातून जाणाऱ्या अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्ग विकास झाल्यास राजपिपळा (वडोदरा) फोरलेन भुसावळपर्यंत जोडल्यास शंभर किलोमीटरचा फेरा व वेळ वाचेल, असे सांगितले. या कामाला मंजुरी मिळाली तर मंत्री गडकरी यांच्या हातून मौल्यवान कार्य होईल, अशी भूमिका मांडली.
आमदार जयकुमार रावल यांनी सोनगीर- दोंडाईचा- शहादा या ७० किलोमीटर, कुसुंबा ते दोंडाईचा या लिंक रोडची, तसेच दिल्ली ते मुंबई व्हाया धुळे महामार्गाचे मजबूतीकरण आणि दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडॉर प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली.