छत्रपती संभाजीनगर

सात दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या पडेगाव येथील पोलिस हवालदार संजय फकिरराव गाडे (वय ५०) यांचा मृतदेह आढळला


औरंगाबाद : सात दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या सुंदरनगर, पडेगाव येथील पोलिस हवालदार संजय फकिरराव गाडे (वय ५०) यांचा मृतदेह रविवारी (ता. ३०) सायंकाळी पोलिस आयुक्तालय परिसरातील विहिरीत आढळला आहे.
खेळताना मुलांचा चेंडू विहिरीकडे गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

गाडे हे पोलिस आयुक्तालयात कार्यरत होते. ते पत्नीसह पडेगावमध्ये राहायचे. सोमवारी (ता. २४) सकाळी नऊ वाजता ते ड्यूटीला जातो म्हणून घरातून बाहेर पडले होते. ते पोलिस आयुक्तालयात हजरही झाले. दुपारी एक वाजता पोलिस मुलगा किशोर यांना ते भेटले. तब्येत बरी नाही, आजारी रजा घेतो, असे सांगून त्यांनी स्वत:जवळील पाकीट किशोर यांच्याकडे दिले. त्यात वेतन जमा होणाऱ्या बँकेचे एटीएम कार्ड असल्याचे सांगितले.

त्याचदिवशी सायंकाळी पाच वाजता ते घरी न पोहोचल्याने आईने मुलांना फोनवरून सांगितले. त्यावर तिन्ही मुलांनी शोधाशोध सुरू केली. मुख्यालयात विचारपूस केली. घाटी हॉस्पिटल, सर्व कोविड सेंटर, विद्यापीठ परिसर, सावंगी बायपास, सर्व नातेवाईक, पूर्वी राहण्याचे ठिकाण सनी सेंटर आदी ठिकाणी शोध घेतला. मात्र, काहीही पत्ता लागला नाही. त्यानंतर अखेर, बेगमपुरा पोलिस ठाण्यात मिसिंगची खबर दिली होती.

दरम्यान, पोलिस आयुक्तालय परिसरात रविवारी सायंकाळी फुटबॉल खेळणाऱ्या मुलांचा चेंडू विहिरीकडे गेल्यावर ते तिकडे गेले असता विहिरीतून दुर्गंधी आली. त्यामुळे डोकावून पाहिल्यावर मृतदेह असल्याचे उघड झाले. ही विहीर पोलिस आयुक्तालयातील शासकीय निवासस्थान परिसरात आहे. त्यावर ही माहिती बेगमपुरा ठाण्याचे अशोक भंडारे यांना दिली. ते उपनिरीक्षक ज्योती गात यांच्यासह घटनास्थळी धावले. त्यानंतर अग्निशामक दलाचे ड्यूटी इंचार्ज एम. एल. मुंगसे, एल. पी. कोल्हे, विनायक लिमकर, जवान सुजीत कल्याणकर, सचिन शिंदे, शुभम आहेकर, विक्रम भुईगळ, वाहनचालक सुभाष दुधे यांनी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर घाटीत नेण्यात आला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *