सरकार जर किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देत असेल तर शेतकऱ्यांना गांजाची शेती करायला परवानगी द्या
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला भाजपाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. यातच आता नांदेडच्या शेतकऱ्याने राज्य सरकारवर टीका करत गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
नांदेडचे शेतकरी अविनाश अनेराये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गांजाच्या शेतीला परवानगी मिळण्यासंदर्भात ईमेल केला आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळत चाललं आहे. त्यात कोविड आणि काही विभागात कडाक्याची थंडी आणि गारांचा पाऊस यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरी आपण सरसकट शेतकऱ्यांना गांजा लागवडीसाठी सशर्त परवानगी देऊन त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सहकार्य करावे, असं या ईमेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
सरकार जर किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देत असेल तर शेतकऱ्यांना गांजाची शेती करायला परवानगी द्या अशी मागणी नांदेड भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे. सरकारला दारू विक्रीतून उत्पन्न वाढवायचे असेल तर गांजाच्या शेतीतूनही चांगले उत्पन्न होईल असे म्हणत नवाब मलिकांच्या जावयाने हर्बल तंबाखूच्या नावाखाली गांजा उत्पादन केलेच आहे त्यामुळे शेतकऱ्यांना गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी चिखलीकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. खासदार चिखलीकर आज नांदेडमध्ये बोलत होते.
राज्यातील द्राक्ष बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना देण्यासाठी आता सुपर मार्के्ट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शैक्षणिक आणि धार्मिक स्थळांच्या जवळ मात्र वाइन विक्रीला परवानगी मिळणार नाही. भाजपने या निर्णयाला विरोध केला आहे. राज्यात पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त असून काही जिल्ह्यातील दारूबंदी संपवून नवीन दारूविक्री परवाने देण्यात आले. आता तर सुपर मार्केटमध्ये दारूविक्रीला परवानगी देऊन घरोघरी दारू पोचविण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे, असा सवाल विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.