शेतात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना घाबरवण्यासाठी भाजप मंत्र्याच्या मुलाचा हवेत गोळीबार
पाटना : शेतात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना घाबरवण्यासाठी भाजप (BJP) मंत्र्याच्या मुलानं हवेत गोळीबार करून स्थानिकांना मारहाण केल्याचा आरोप आहे. बिहारमधील (Bihar) पश्चिम चंपारण जिल्ह्यातील हरदिया गावात रविवारी ही घटना घडली असून बिहारचे पर्यटन मंत्री आणि भाजप नेते नारायण प्रसाद (BJP Leader Narayan Prasad) यांच्या मुलाने हा गोळीबार केला आहे.
मंत्री नारायण प्रसाद यांचा मुलगा बबलू यांच्या शेतात मुलं क्रिकेट खेळत होती. त्यांनी मुलांना मैदान मोकळे करण्यास सांगितले. त्यावेळी वाद झाला. त्याने काही स्थानिकांना मारहाण देखील केली. त्यानंतर पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेत अनेक स्थानिक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यानंतर या घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच ते देखील आक्रमक झाले. त्यांनी मंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांच्या वाहनाची तोडफोड केली.
पोलिसांना दोन गटात राडा झाल्याची माहिती मिळतातच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, बिहारचे मंत्री नारायण प्रसाद यांनी ग्रामस्थांनी आपल्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला आहे. त्याला विरोध केला असता ग्रामस्थांनी धाकट्या भावावर हल्ला केला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आली, असा आरोप मंत्र्यानी केला आहे.
”माझ्या कुटुंबातील सदस्यांना गावकऱ्यांनी मारहाण केल्यानंतर, माझा मुलगा परवाना असलेली रायफल आणि पिस्तुल घेऊन घटनास्थळी गेला. पण त्याच्यावरही दगडफेक करण्यात आली. गावकऱ्यांनी माझ्या वाहनाचीही तोडफोड केली”, असं मंत्री नारायण प्रसाद म्हणाले.
मंत्र्याच्या मुलाने हवेत गोळीबार केल्याचे आरोप फेटाळले असून त्याच्यासह काका हरेंद्र प्रसाद आणि इतर सहकारी जखमी झाल्याचे पोलिस अधीक्षक उपेंद्र वर्मा यांनी सांगितले. तसेच परिसरात तणावपूर्ण स्थिती असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात पोलिस तैनात करण्यात आले आहेत आणि पुढील तपास सुरू आहे, असंही ते म्हणाले.