
देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वेगानं वाढ होऊ लागलीय. दरम्यान, अनेकजण ओमायक्रॉनच्या (Omicron) जाळ्यातही अडकत चालले आहेत.यातच इटलीहून अमृतसरमध्ये आलेल्या चार्टर्ड विमानामधील 125 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आलीय. एकूण 179 प्रवासी या चार्टर्ड विमानातून अमृतसरमध्ये दाखल झाले होते. याबाबत एअरपोर्ट डायरेक्टर वीके सेठनं (VK Seth) याबाबत माहिती दिलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रवासी पंजाबचेच आहेत. विमानतळावर प्रवाशांनीही गोंधळ घातल्याची माहिती समोर येत आहे. एअरपोर्टवर जाणीवपूर्वक कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं जातंय, असाही आरोप प्रवाशांनी केलाय. प्रवाशांनी कोरोनाची दोन्ही लस घेतल्या आहेत आणि 72 तासांपूर्वीच कोरोना चाचणी केली होती. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचंही प्रवाशांचं म्हणणं आहे.
भारतात गुरुवारी ओमायक्रॉनचे सर्वाधिक 495 नवे रुग्ण आढळून आले होते. ज्यामुळं देशातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची एकूण संख्या 2 हजार 630 वर पोहचलीय. यापैकी 797 रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. तर, दिल्ली 465, राजस्थान 236, केरळ 234, कर्नाटक 226, गुजरात 204 आणि तामिळनाडूत 121 रुग्ण आढळून आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयान दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 19 हजार 206 रुग्ण आढळून आले आहेत. तर, 325 जणांचा मृत्यू झालाय. देशातील रिकव्हरी रेट 98.01 टक्क्यांवर पोहचलीय. सध्या देशात 2 लाख 85 हजार 401 रुग्ण सक्रीय आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळं 4 लाख 82 हजार 876 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.