महाराष्ट्रावर मोठं संकट! वादळी वारे. गारपीट अन् मुसळधार; हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा…

राज्यावर अवकाळी पावसाचे संकट ओढावले आहे. राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यासह राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अशातच आता हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्याच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राज्यातील अनेक भागात अलर्ट जारी
राज्यातील हवामानाबाबत बोलताना नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गारपीट आणि वादळी वाऱ्या सह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मार्च महिन्यात महाराष्ट्राच्या अनेक भागात तापमान 40 पर्यंत पोहोचलं आहे, मात्र आता एक प्रणाली विकसित झाली असून त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तीन ते चार दिवस विदर्भासह महाराष्ट्राच्या इतर भागातही अशाच प्रकारची परिस्थिती राहणार आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंशांपर्यंत पोहोचले होते, मात्र आता पावसामुळे त्यात घट होणार आहे , त्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार आहे.
मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
उद्या मराठवाडाच्या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील आणि पश्चिम विदर्भातील जास्तीत जास्त जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात वादळी वारे वाहणार असून काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट ज्या भागामध्ये आहे त्या भागात गारपीट मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचा इशाराही देण्यात आला आबहे.
31 मार्चपासून तीन ते चार दिवस पर्यंत हवामानात मोठा बदल दिसून येणार आहे. त्यामुळे विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच तारखेपर्यंत अनेक भागात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि सामान्य नागरिकांनी हवामान विभाग वारंवार देत असलेल्या इशाऱ्याकडे लक्ष देण्याते आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात मुसळधार पाऊस
उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांमध्ये अचानक हवामान बदलल्याने वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे. विशेषतः जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध शिवनेरी हापूस आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भाजीपाला, कांदा, बटाटा आणि इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.
पुण्याच्या भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह आणि गारांसह पावसाने हजेरी लावली. भोर तालुक्यातील वडगाव डाळ गावात जोरदार गारांचा पाऊस झाल्याने यात्रेनिमित्त ग्रामदैवताच्या मंदिरासमोर टाकलेला मंडप, गारांच्या वजनाने कोसळला. या अवकाळी पावसामुळे वडगाव डाळ गावातील 7 घरांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांच्या छतावरील पत्रे, कौल उडाली आहेत. तसेच काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.



