
इराणने अमेरिकेच्या विरोधात प्रत्युत्तरादाखल कारवाईत कतार येथील एक अत्यंत महत्त्वपूर्ण रडार सिस्टीमवर हल्ला केला आहे. हा रडार अमेरिकन स्पेस फोर्सचा एएन/एफपीएस-132 बॅलेस्टिक मिसाइल अर्ली वॉर्निंग रडार आहे.
इराणचा हा हल्ला यशस्वी ठरला असून रडारला मोठे नुकसान पोहोचले असल्याचे उपग्रहीय छायाचित्रांमधून स्पष्ट झाले आहे. ही सिस्टीम सुमारे 1.1 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 9 हजार कोटी रुपयांची आहे. हा मध्यपूर्वेत अमेरिकेचा सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वपूर्ण रडार आहे.
या रडारचे मुख्य काम शत्रूने डागलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा जलद माग काढणे आहे, जेणेकरून अमेरिकेचे सैन्य आणि त्याच्या सहकारी देशांना वेळेत इशारा मिळू शकेल. एका कारपेक्षाही स्वस्त शाहेद ड्रोनने या महाग आणि अत्यंत महत्त्वपूर्ण सुरक्षा प्रणालीला अंध करून सोडले आहे. ही घटना अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी उघड करणारी आहे.
हा रडार का खास?
एएन/एफपीएस-132 रडारला अपग्रेडेड अर्ली वॉर्निंग रडार (युईडब्ल्यूआर) म्हटले जाते. हा अमेरिकेच्या ग्लोबल वॉर्निंग नेटवर्कचा हिस्सा आहे, याला 2013 मध्ये कतार येथे तैनात करण्यात आले होते. याची डिटेक्शन रेंज 5 हजार किलोमीटर असून हा इराण, अन्य देशांमधून डागण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्रांना अत्यंत दूरवरून टॅक करू शकतो.
हा रडार अल उदैद वायुतळानजीक असून तो मध्यपूर्वेतील अमेरिकेचा सर्वात मोठा वायुतळ आहे. येथून अमेरिका पूर्ण क्षेत्रात स्वत:च्या सैन्याला सहाय्य करतो. हा रडार क्षेपणास्त्र डागण्यात येताच त्याची दिशा, वेग आणि लक्ष्याची माहिती देतो. यामुळे पॅट्रियट किंवा थाड यासारख्या क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणालीला सक्रीय करण्यास वेळ मिळतो. या रडारशिवाय अमेरिका आणि त्याचे सहकारी देश म्हणजेच सौदी अरेबिया, युएईला क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून बचाव करणे अवघड ठरणार आहे. ही प्रणाली जगातील काही ठिकाणीच असल्याने याचे नुकसान अत्यंत मोठे मानले जातेय.
इराणने कसा घडविला हल्ला?
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने याला ‘ट्रू प्रॉमिस’ ऑपरेशनचा हिस्सा ठरविले आहे. इराणने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs आणि ड्रोन्सने हा हल्ला केला. इराणच्या बहुतांश क्षेपणास्त्रs आणि ड्रोन्सना रोखले, परंतु यातील काही अल उदैद तळावर कोसळली. एका ड्रोनने रडार साइटला टार्गेट केले असे कतारच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. रडार पूर्णपणे नष्ट झाल्याचा दावा इराणने केला आहे. तर अमेरिका किंवा कतारने आतापर्यंत नुकसानीचा पूर्ण तपशील उघड केलेला नाही. परंतु उपग्रहीय छायाचित्रांमधून रडारला मोठे नुकसान पोहोचल्याचे स्पष्ट दिसते. अमेरिकेची रणनीतिक प्रणाली एखाद्या शत्रूच्या हल्ल्यामुळे इतकी प्रभावित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या हल्ल्याचे प्रभाव कोणते?
हा हल्ला अमेरिकन मिसाइल डिफेन्स शील्डला मोठा झटका आहे. आखाती क्षेत्रात अमेरिकेची दृष्टी कमकुवत झाली आहे. आता क्षेपणास्त्र डागण्यात आल्यास पूर्वइशाऱ्याचा वेळ कमी असू शकतो. यामुळे अमेरिकन तळ, इस्रायल आणि आखाती देशांच्या सुरक्षेवरील धोका वाढला आहे. स्वस्त ड्रोन्सद्वारे महाग प्रणालीला लक्ष्य केले जाऊ शकते हे इराणने दाखवून दिले आहे. अमेरिकेला आता नव्या पद्धतीने स्वत:च्या सुरक्षेला मजबूत करावे लागणार आहे. कतार सारख्या देशांमध्ये अमेरिकेचे तळ असल्याने क्षेत्रीय तणाव आणखी वाढू शकतो.



