मठात 11 माळ जप केला म्हणजेच स्वामींची कृपा होते का? पूजा विधींबाबत श्री स्वामी समर्थांचे स्पष्ट मत…

मठात 11 माळ जप केला म्हणजेच स्वामींची कृपा होते का?
पूजा विधींबाबत श्री स्वामी समर्थांचे स्पष्ट मत
स्वामी अवतार घेऊन आज कित्येक वर्ष लोटली मात्र आजही त्यांचे विचार आचरणात आणणारे त्यांचे अनेक भक्त आहेत.
स्वामींचे भक्त कायमच स्वामींनी दिलेला तारकमंत्र असो किंवा त्यांचं नामस्मरण असो हे नित्यनेमाने करतात. अनेक स्वामी भक्त दर गुरुवारी स्वामींच्या मठात जातात 11 माळ जप करतात.सर्वसाधारण असं म्हटलं जातंं की, स्वामीचं नामस्मरण 11 माळ जप करत केल्याने त्यांची कृपादृष्टी होते. मात्र याबाबत स्वामी समर्थांनी त्यांच्या भक्तांना एक शिकवण दिली होती.
स्वामींना मानणारा वर्ग मोठा आहे पण त्यांचे विचार आचरणात आणणारा मात्र कमी आहे. त्यांची पूजा केली व्रत पारायणं केली म्हणजे स्वामी आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात मग जो स्वामींची भक्ती करत नाही त्याच्यावर स्वामींची कृपा होत नाही का यावर स्वत: स्वामी म्हणतात की, कर्मकांड हे फक्त एक सोपस्कार आहेत. जर एखादी व्यक्ती जी स्वामींना मानते आणि रोजच्या रोज तारकमंत्र किंवा मठात जाऊन 11 माळ जप करते आणि फक्त त्यावरच अवलंबून राहते तर स्वामी कधीच अशा भक्तांवर कृपा करत नाही. देव देव करुन देव भेटत नाही असं स्वामींनी सांगितलं. देवाची पूजा केल्याने शरीर आणि मन प्रसन्न व्हायला हवं. एखादा व्यक्ती देवाचं सगळं करतोय पण जवळच्या माणसांची वाईट वागणं किंवा अवतीभवती असलेल्या माणसांना चुकीची वागणूक देणं अशा व्यक्ती स्वामींचे कधीच भक्त नसतात स्वामी त्यांना आपले भक्त मानत देखील नाहीत.
स्वामींच्या मते खरा भक्त कोण ?
स्वामी म्हणतात की, 11 माळ जप किंवा तारक मंत्राचं पठण करुन कृपा मिळवता येत नाही तर अंत:करण शुद्ध असावं लागतं. नाही 11 माळ पण स्वामींची एक माळ असा जप असावा ज्यातं मानतील भाव शुद्ध आणि समर्पणाचा असावा. स्वामी कधीच म्हणत तुमची कामं आणि कर्तव्य सोडून माझी भक्ती करा. स्वामी हेच म्हणतात की तुमचं मन सेवाभावी असूद्यात. जो इतरांना मदत करतो जो इतरांशी माणूस म्हणून वागतो, ज्याला अनेक आव्हान पेलताना देखील देवावर असलेली श्रद्धा कायम ठेवता येते असा व्यक्ती स्वामींचा भक्त असतो.
अनेक जण असे आहेत जे कधीच स्वामींचं नामस्मरण करत नाही किंवा त्यांना स्वामी समर्थांबद्दल माहित देखील नाही पण तरीही स्वामी त्यांच्या पाठीशी कायम असतात कारण अशा माणसांचं कर्म चांगलं असतं त्यांच्या सत्कर्मामुळे स्वामी महाराज कायम पाठीशी असतात. देवाला धुप कापूर दाखवून काही होत नाही. देव श्रद्धा आणि विश्वासाचा भूकेलेला असतो. त्यामुळे स्वामी हेच सांगतात की मन शांत ठेवण्यासाठी किंवा कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तारकमंत्र आणि नामस्मरण आहेच पण हे तेव्हाच काम करेल जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल.
स्वामींच्या विचारांनी चालणारे जाणकार यश कदम त्यांच्या मुलाखतीत असं सांगतात की तुम्ही स्वामींच्या 11 माळ जप नका करु पण एक माळ अशी करा की त्यातील एक मणी अक्कलकोटच्या औंदबर झाडाला ऐकू जाईल, मणी चोळप्पा महाराजांच्या समाधीला ऐकू जाईल. इतकं सामर्थ्य तुमच्या भक्तीत असायला हवं. तेव्हा लक्षात येईल की स्वामी महाराज तुमच्या अंतरात्म्यात आहेत.






