वादळात सापडली नाव अन्..; श्री क्षेत्र कुणकेश्वराच्या मंदिराची अंगावर काटा आणणारी थरारक कथा…

हिंदू धर्मात काशी विश्वेश्वराला मोठं महत्व आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे काशी. असं म्हणतात की याठिकाणी महादेवाचं दर्शन झालं की जन्माचं सार्थक झालं. असं असलं तरी महाराष्ट्रातील प्रतिकाशी म्हणून एक ठिकाण ओळखलं जातं ते म्हणजे कुणकेश्वर. समुद्राची गाज, नारळी पोफळीच्या बागा तांबडी माती या सगळ्या मन वेधून घेणाऱ्या निसर्गाच्या कुशीत वसलेलं महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं ते श्री क्षेत्र कुणकेश्वर.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात समुद्रकिनाऱ्यावर वसलेले कुणकेश्वर मंदिर हे कोकणातील सर्वात प्राचीन आणि पवित्र शिवमंदिरांपैकी एक मानले जाते. या मंदिराला “कोकणातील काशी” असेही संबोधले जाते. यामागे एक सुंदर पौराणिक गोष्ट सांगितली जाते ती अशी की, प्राचीन काळी या भागात महर्षी कुनक नावाचे एक महान ऋषी राहत होते. ते अत्यंत तपस्वी आणि भगवान शंकराचे परमभक्त होते. त्यांनी समुद्रकिनारी बसून वर्षानुवर्षे तप केला. अखेर त्यांच्या अथक तपश्चर्येला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी महर्षी कुनकांसमोर स्वयंभू शिवलिंगाच्या रूपात प्रकट होऊन आशीर्वाद दिला. त्यानंतर या ठिकाणाला महर्षींच्या नावावरून “कुणकेश्वर” असे नाव मिळालं अशी एकदंत कथा सांगितली जाते.
कुणकेश्वर मंदिराची आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे, स्थानिक लोककथेनुसार, काही व्यापारी खलाशी समुद्रातून प्रवास करत होते. अचानक समुद्रात भयाण वादळ आलं उधाणलेला समुद्रात नाव काही तग धरुन राहिना. आता आपला जीव इथेच जाणार असं त्या व्यापारांना वाटत होतं. त्यातील एका व्यापाऱ्याला किनाऱ्याजवळ जळणारा दिवा दिसला. भर पावसात हा दिवा कसा काय तेवत राहतोय असा प्रश्न त्या व्यापाराऱ्याला पडला. त्यावेळी त्याला वाटलं हे काही साधं सुदं नाही. हा काहीतरी दैवी चमत्कार असावा असं त्याला वाटलं. त्यानंतर त्याने त्या दिव्याकडे पाहात मनोमन प्रार्थना केली की, माझी नाव किनाऱ्याला लागूदेत मी तुझ्या नावाचं येथे मंदिर बांधेल. मला संकटातून तू वाचव.
मग काय ? वादळ शांत झालं आणि नाव किनाऱ्याला आली तो दिवा तसाच तिथे जळत होता. त्या व्यापारी खलाशाने पाहिलं तिथे महादेवांची पिंड होती. मग त्या व्यापाराने आपलं वचन पाळलं आणि मग तिथे महादेवाचं भलं मोठं मंदिर बांधलं जे आज कुणकेश्वर नावाने प्रसिद्ध आहे, अशी देखील एक कथा सांगितली जाते. आश्चर्य म्हणजे हे मंदिर समुद्राच्या अगदी काठावर असूनही कधीच पाण्याने बुडत नाही. समुद्राच्या लाटा मंदिराजवळ येऊन पुन्हा मागे फिरतात पण पाणी कधीच मंदिराच्या आत येत नाही.
प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला येथे हजारो भक्त भाविक दर्शनासाठी येतात. मंदिरातील शांत वातावरण, समुद्राचा गडद निळा विस्तार आणि लाटांची गाज हे सगळं डोळ्याचं पारण फेडतं.कुणकेश्वर मंदिर ही केवळ श्रद्धेची जागा नसून निसर्ग, भक्ती आणि प्राचीन संस्कृतीचं अद्भुत मिश्रण आहे. इथे आल्यावर मनात “ॐ नमः शिवाय” च्या मंत्राने अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
या मंदिराला धार्मिक बाजूबरोबरच ऐतिहासिक बाजू देखील आहे. १७व्या शतकात, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टी स्वराज्यात सामील केली आणि “सिद्दी”, पोर्तुगीज, आणि मुघल यांच्या हल्ल्यांपासून कोकणातील मंदिरे, बंदरे आणि लोकसंस्कृतीचे रक्षण केले.त्याच काळात कुणकेश्वर मंदिर समुद्राच्या अगदी काठावर असल्याने परकीय हल्ल्यांना सामोरं जावं लागायचं. स्थानिक कथांनुसार, महाराजांनी या मंदिराच्या परिसरात नजरबंदी आणि संरक्षणासाठी गडसदृश बुरुज उभारले, आणि मंदिराचा जीर्णोद्धार केला. काही इतिहासकारांच्या मते, महाराजांनी देवगडचा देवगड किल्ला बांधल्यानंतर त्याच परिसरातील धार्मिक स्थळांचं संरक्षण करण्याचे आदेश दिले.
कुणकेश्वर मंदिर त्या क्षेत्रात असल्याने, ते महाराजांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक संरक्षण धोरणाचा भाग होता असं देखील सांगितलं जातं.






