
भारतात अनेक रहस्यमयी ठिकाणे आहेत. उत्तर पूर्व भारतातील सर्वात महत्त्वाचे राज्य आसाम हे कामाख्या देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. तसेच आसाममधील खाद्यपदार्थही खूप खास आहेत. आसाममधील इतिहास, संस्कृती आणि निसर्ग खूप सुंदर आहे.
आसाममध्ये जटिंगा नावाचे एक अनोखे गाव आहे. या गावात दरवर्षी सायंकाळी विचित्र घटना घडत असते. यामागील कोडे अजून उलगडलेले नाही. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जटिंगा हे गाव आसामच्या दिमा हासाओ जिल्ह्यात आहे. हे गाव गुवाहाटीपासून 330 किमी दक्षिणेस आणि हाफलोंग शहरापासून फक्त 9 किलोमीटरवर आहे. या गावात 25000 लोक राहतात. पक्षी संशोधकांसाठी हे खास गाव आहे. दरवर्षी, सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत, या गावात विचित्र घटना घडते. येथे स्थलांतरित पक्षांचा धडकून अचानक मृत्यू होतो. शास्त्रज्ञांना यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात जटिंगा गावाच्या आजूबाजूच्या टेकड्या धुके आणि ढगांनी झाकल्या जातात. याच काळात, टायगर बिटरन, किंगफिशर, लिटिल एग्रेट, ब्लॅक ड्रोन, ग्रीन पिजन, हिल पॅट्रिज, एमराल्ड डव्ह आणि नेकलेस्ड लाफिंग थ्रश हे पक्षी गावाच्या दिशेने उडतात आणि बांबूच्या खांबाला, झाडांना किंवा घरांना धडकतात, ज्यामुळे ते जखमी होतात किंवा त्यांचा मृत्यू होतो. दरवर्षी या काळात हे पक्षी मरण पावतात. यामागे काय कारण आहे हे अद्याप समोर आलेले नाही.
जोरदार वारे कारणीभूत
जटिंगामध्ये पक्षांचा मृत्यू का होतो याचा शोध घेण्याचे काम शास्त्रज्ञ करत आहेत. प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ अन्वरुद्दीन चौधरी यांनी “द बर्ड्स ऑफ आसाम” या पुस्तकात लिहिले ही पावसाळ्यात जोरदार वारे आणि दाट धुक्यामुळे पक्ष्यांची दिशाभूल होते, त्यामुळे हे पक्षी गावातील लाईटच्या दिशेने उडतात आणि नंतर धडकून मरतात. प्रसिद्ध निसर्गशास्त्रज्ञ ई.पी. जी आणि इतर पक्षी तज्ञांनी पर्वतांवरील धुके आणि वारे यामुळे या पक्ष्यांचा मृत्यू होतो.
स्थानिकांचे काय म्हणणे आहे?
पुरामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पक्ष्यांची घरटी नष्ट होतात,त्यामळे हे पक्षी जटिंगाच्या दिशेने उडतात. काही शास्त्रज्ञांच्या म्हणण्यांनुसार, जटिंगा परिसरातील भूगर्भातील पाण्यामुळे भूचुंबकीय क्षेत्र निर्माण झाले आहे, यामुळे पक्ष्यांच्या दिशा शोधण्याच्या क्षमतेत व्यत्यय येतो. त्यामुळे त्यांचा अपघात होतो आणि त्यांचा मृत्यू होतो. असाही समज आहे की, गावातील दिवे आणि टेकड्यांवर लावलेले सर्चलाइट्स पक्ष्यांना आकर्षित करतात. या ठिकानांकडे उडताना पक्षांचा अपघात होतो आणि ते मरतात.
या विचित्र घटनेमुळे जटिंगा गाव प्रसिद्ध झाले आहे. मात्र या मागील कारण शोधण्यासाठी भारत आणि परदेशातील शास्त्रज्ञ आणि पक्षीप्रेमी या गावाला भेट देतात. या भागातील पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी अनेक पर्यावरणवादी गावकऱ्यांना या पक्ष्यांची शिकार न करण्याचे आवाहन करतात.






