
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भारतात लोकपाल व्यवस्था लागू करण्यात आली. लोकपाल अध्यक्ष आणि 7 सदस्यांसाठी प्रत्येकी 70 लाख रुपयांची आलिशान बीएमडब्लू गाड्या खरेदी करण्याचा निर्णय 16 ऑक्टोबर रोजी जारी केला.
माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. लोकपालची निर्मिती वायफळ खर्चासाठी करण्यात आलेली नाही, त्यामुळे असले निर्णय टाळायला हवेत, असे त्या म्हणाल्या. त्यानंतर आता लोकपालसाठी चळवळ उभी करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीदेखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले की, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आम्ही लोकपाल चळवळ उभारली, त्यासाठी आम्ही संघर्ष केला. त्यातूनच ही लोकपाल संस्था अस्तित्वात आली. लोकपालची स्थापना ही भ्रष्टाचार थांबवण्यासाठी झाली. पण आता जर लोकपालच भ्रष्टाचार होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या निर्णयांमध्ये सहभागी होत असेल. तर ती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.” असे म्हणत त्यांनी या मागणीवर नाराजी व्यक्त केली. तसेच, माजी आयपीएस अधिकारी आणि जनलोकपाल चळवळीच्या प्रमुख समर्थक किरण बेदी म्हणाल्या की, पंतप्रधान स्वदेशीवर भर देत असताना, लोकपाल परदेशी गाड्या का खरेदी करत आहे? आपल्याकडे चांगल्या भारतीय गाड्या नाहीत का? हा निर्णय पंतप्रधान मोदींच्या स्वदेशी मिशनच्या विरोधात आहे.” असे म्हणत आपली नाराजी जाहीर केली.
भारतात भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपाल सदस्यांची नेमणूक केलेली आहे. या लोकपाल सदस्यांना आता आलिशान आणि महागड्या बीएमडब्ल्यू गाड्या मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. लोकपाल अध्यक्ष आणि सदस्य अशा एकूण सात जणांना BMW 3 Series 330Li या मॉडेलच्या गाड्या घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी निविदाही जारी करण्यात आली आहे. त्यामुळे या निविदांमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेसनेदेखील या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते खासदार पी. चिदंबरम यांनीही या कारखरेदीवरून जोरदार टीका केली. “सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सिदान ही गाडी दिली जाते. मग लोकपाल आयुक्त आणि 7 सदस्यांना आलिशान बीएमडब्ल्यू गाड्यांची गरज काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.






