
महाराष्ट्रात पावसाचं जोरदार पुनरागमन झालं आहे, राज्यातील अनेक भागांना पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे, मराठवाडा आणि विदर्भात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.
दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाड्यात आणि विदर्भात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, अनेक गावांचा सर्पंक तुटला आहे.
पावसाचं संकट अजूनही टळलेलं नाहीये, 16 सप्टेंबरला देखील भारतीय हवामान विभागाकडून (IMD) महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे कोकणातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस कोसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकणातील काही भागांमध्ये कमी वेळात अधिक पाऊस होऊ शकतो, असा अंदाज देखील हवामान विभागनं वर्तवला आहे, त्यामुळे या पार्श्वभूमीवर नागरिकांना हवमान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान मंगळवारी म्हणजे 16 सप्टेंबर रोजी राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे, रायगड, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, चंद्रपूर, गडचिरोली, सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे