ट्रम्प यांच्या नाराजीचं सर्वात मोठं कारण आलं समोर. भारत अनेक देशांकडून ही गोष्ट खरेदी करतो, पण…

अमेरिकेने भारतावर 50 % कर लादला आहे. यामागे डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक कारणे सांगितली आहेत. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे हे त्यातील एक प्रमुख कारण आहे. अलिकडेच अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांनी म्हटले होते की, ‘भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे, पण ते आपल्याकडून एकही पोतं मका खरेदी करत नाही.
जर भारत मका खरेदी करत नसेल तर त्यांना शुल्काचा सामना करावा लागेल. अमेरिकन मंत्र्यांच्या या विधानानंतर हेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील नाराजीचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. तसेच भारत अमेरिकेकडून मका का खरेदी करत नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भारतात मकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे भारत दुसऱ्या देशांना मका निर्यात करत असे. मात्र देशात इथेनॉलचे उत्पन्न सुरु झाल्यापासून मकाची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे सरकारने मका आयात करण्यास सुरुवात केली आहे. भारत सध्या बऱ्याच देशांकडून मका आयात करत आहे. मात्र भारत अमेरिकेतून मका आयात करत नाहीत, त्यामुळे ट्रम्प यावर संतापले आहेत. भारत इतर देशांकडून मका खरेदी करू शकतो, तर आपल्याकडून का नाही? असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे.
भारतात मकाचे किती उत्पादन होते?
मकाच्या उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात सहाव्या स्थानावर आहे. भारतात मका खाण्याव्यतिरिक्त पशुखाद्य, इथेनॉल उत्पादन आणि कुक्कुटपालनासाठी केला जातो. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या देशात सुमारे 4 कोटी टन मकाचे उत्पादन होते. 2047 पर्यंत ते 8.6 कोटी टनांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे.
भारत या देशांकडून मका खरेदी करतो
इथेनॉल तयार करण्यासाठी भारताला मका आयात करावी लागत आहे. वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये भारताने म्यानमारकडून 1 ते 2 लाख टन मका खरेदी केली. तसेच जानेवारी-ऑगस्ट 2025 मध्ये भारताने युक्रेनकडून सुमारे 4 लाख टन मका खरेदी केली. तसेच थायलंड, अर्जेंटिना या देशांकडूनही भारताने मका खरेदी केला आहे. मात्र भारताने या काळात अमेरिकेकडून मका खरेदी केलेली नाही.
भारत अमेरिकेकडून मका का खरेदी करत नाही?
अमेरिकेत पिकणारी मका भारतासाठी धोकाकायक – अमेरिकेकडून मका खरेदी न करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तेथील मका संकरित आहे. भारतात ही मका खाण्यासाठी किंवा प्राण्यांसाठी वापरण्यावर बंदी आहे.
कर आणि किंमत – अमेरिकेकडून मका खरेदी न करण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, अमेरिकन मका वर 50 टक्के कर आहे. त्याऐवजी भारत युक्रेन आणि म्यानमारमधून करमुक्त मका खरेदी करतो. तसेच अमेरिकेतून मका आयात करण्याचा खर्च देखील जास्त आहे.
मागणी आणि पुरवठ्यातील तफावत – भारताला लागणारी सर्व मका आपल्या देशातच उत्पादित केली जाते. थोडीफार लागणारी मका कर नसणाऱ्या देशांकडून खरेदी केली जाते. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत आहे.
शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण – भारत देशांतर्गत शेतकऱ्यांना प्राधान्य देतो, शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी भारत अमेरिकन मका खरेदी करत नाही.