
कोल्हापूर : शिवी दिल्याने जिवलग मित्रानेच हनुमाननगरातील रिक्षाचालक मोहन सूर्यकांत पोवार (वय ७३) यांच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी घडला. दोघांची सुमारे ६० वर्षे मैत्री होती.
हल्लेखोर पळून जाताना वायर ओढली गेल्याने शॉर्टसर्किटमुळे आग लागून घरातील एक खोली पेटली. सकाळी अकराच्या सुमारास पोवार यांच्या घरातून धूर बाहेर आल्याचे पाहून स्थानिक जमा झाले. त्यांनी घरात जाऊन आग आटाेक्यात आणल्यानंतर बेडरूममध्ये पोवार रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलिसांनी त्यांचा जिवलग मित्र चंद्रकांत केदारी शेळके (७३, रा. मोहिते मळा, देवकर पाणंद) याला अवघ्या चार तासांत अटक केली.
याबाबत जुना राजवाडा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हनुमाननगर मुख्य रस्त्यालगत मोहन पोवार यांचे घर आहे. पोवार यांच्या पत्नीचे निधन झाले असून, मुलगा पुष्कराज सोबत ते राहत होते. पुष्कराज एका अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक आहे. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास तो बाहेर पडला. दरम्यान, सकाळी अकराच्या सुमारास घरातून धूर बाहेर येऊ लागल्याचे स्थानिकांनी पाहिले. चंद्रनील कुलकर्णी यांनी परिसरात राहणारे सचिन हिलगे यांना माहिती दिली. कुलकर्णी व हिलगे यांना मागील दरवाजा उघडा असल्याने आत शिरून आग आटोक्यात आणली. यावेळी बेडरूममध्ये मोहन पोवार रक्ताच्या थारोळ्यात दिसून आले. त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण वार झाल्याने ते निपचित पडले होते. दोघांनी पोलिसांना कळवली.
घटनास्थळी बघ्यांची गर्दी…
घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. मोहन पोवार यांच्या भागात चांगला संपर्क असल्याने त्यांच्या खून झाल्याचे कानावर पडल्याने अनेकांना विश्वास बसला नाही. यामुळे घटनास्थळी गर्दी झाली होती. शहर उपअधीक्षक प्रिया पाटील, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे, सहायक निरीक्षक विशाल पाटोळे घटनास्थळी दाखल झाले. अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार यांनीही घटनास्थळी येऊन माहिती घेतली.
हल्लेखोर वयोवृद्धच….
जुना राजावाडा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यामध्ये एक वयोवृद्ध पोवार यांच्या घरासमोरून जाताना दिसून आला. त्याच्या अंगावरील कपडेही रक्ताने माखल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी तपास गतिमान केला. संशयित चालतच देवकर पाणंदच्या दिशेने जाताना अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्या फुटेजच्या आधारे पोलिस संशयित शेळकेच्या घरापर्यंत पोहोचले.
रक्ताचे कपडे धुताना सापडला…
पोलिसांनी चंद्रकांत शेळके याला ताब्यात घेण्यासाठी घरात पोहोचले. यावेळी संशयित रक्ताने माखलेले कपडे धुताना मिळून आला. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या शेळके याने काही वेळानंतर खुनाची कबुली दिली.
चहा बनवून दिला अन्…
मोहन पोवार आणि चंद्रकांत शेळके महाविद्यालयात असताना एकाच वर्गात शिकत होते. दोघेही पन्नास वर्षांहून अधिक काळ चांगले मित्र आहेत. मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेले शेळके तपोवन मैदानाहून हनुमाननगरात आले. यावेळी पोवार यांची रिक्षा दारात दिसल्याने त्यांच्या घरात गेले. पोवार यांनी स्वतः दोघांसाठी चहाही बनवला. यानंतर गप्पा सुरू असताना दोघांत वाद होऊन आईवरून शिवी दिल्याच्या रागातून आपण मोहन पोवार यांच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची कबुली संशयिताने पोलिसांसमोर दिली.
दोघांत झटापट…
शेळके याने सुरुवातीला एका पाईपने पोवार यांना मारहाण केल्याचे दिसून आले. लोखंडी पाईप वाकलेली मिळून आली. दोघांत झालेल्या झटापटीत शेळकेच्या डोळ्यालाही दुखापत झाली आहे; पण ताकदीने सदृढ असलेल्या शेळकेने खोलीतील चाकू आणून पोवार यांच्या गळ्यावर वार केला. रक्ताच्या धारा वाहू लागल्याने खोलीतील कपाट, भिंतीही लाल झाल्या होत्या.
खोलीतील साहित्य जळाले….
झटापटीत शेळकेने एका वायर ओढली. यामुळे शॉर्टसर्किट होऊन खोलीला आग लागली. यानंतर शेळके घरातून निघून गेला. काही वेळातच पोवार यांच्या बेडरूममधील पुस्तके, कपडे, गादी आगीची भक्ष्यस्थानी पडून आग पसरत गेली. धूर खोलीबाहेर येताना पाहून स्थानिकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीत पोवार यांच्या अंगावरील कपडेही जळाले.
स्थानिक मंडळाकडून पोवार यांचा सत्कार….
मोहन पोवार यांचा भागात चांगला परिचय होता. रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मदत केली होती. रात्री-अपरात्री एखाद्याच्या घरातील रुग्णाला दवाखान्यात दाखल करणे, लहान मुले, वृद्धांना मदत करणे अशातून त्यांच्याबद्दल अनेकांना आपुलकी होती. हनुमान तरुण मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक म्हणून बुधवारी रात्रीच त्यांचा जाहीर सत्कार झाला होता. गुरुवाी त्यांचा खून झाल्याने अनेकांना धक्का बसला.
मुलाची धडपड आणि आक्रोश
मुलगा पुष्कराज सकाळी साडेआठच्या सुमारास घराबाहेर पडला. त्याला घटनेची माहिती मिळताच तो परतला होता; पण न्यायवैद्यक पथक येईपर्यंत कोणालाही खोलीत सोडले नव्हते. पुष्कराजलाही बाहेर थांबविण्यात आले. ‘मला माझ्या वडिलांना पाहू द्या, त्यांना कोणी मारले मला सांगा’ अशी विचारणा तो करीत होता. वडिलांना साद घालत त्याने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.