तर, वर्षा बंगल्यावर जाऊन फडणवीसांना धुवून काढले…जरांगे पाटलांनी सोडली पातळी, नव्या वादाला फुटणार तोंड…

मनोज जरांगे पाटलांचे मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त विधान मनोज जरांगे पाटलांवर रुग्णालयात उपचार सुरू मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. सरकारने जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. दरम्यान पाच दिवसांनी जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत. यावेळी संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे.
नेमके प्रकरण काय?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांना घेरण्यासाठीच मुंबईत आंदोलन केले असे विधान केले होते. यावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी राऊत यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे.
मुंबईत मराठ्यांना पाऊल ठेवू दिले जाणार नसते तर, वर्षा बंगल्यावर जाऊन फडणवीसांना धुवून काढले असते असे विधान जरांगे पाटील यांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीस यांना घेरण्याचा मुख्य उद्देश्य या आंदोलनाचा होता, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “शिंदे साहेब बिचारा माणूस तसे कधीच करू शकत नाही. राऊत साहेब म्हटले हे त्यांचे राजकीय टोले असतील. मुंबईत उभारू देणार नाही असे ते म्हणाले होते. आम्हाला काही करायचे असते तर फडणवीसांना वर्षा बंगल्यावर जाऊन धुतला असता.”
आधी देखील आपल्या आंदोलनाच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना पाहायला मिळाले आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर देखील वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी वादग्रस्त विधान मागे घेतले होते. मात्र आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. भाजप नेते अक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.