प्रसिद्ध उद्योजकाचा भीषण आगीत कुटुंबासह होरपळून मृत्यू, दीड वर्षाच्या नातवाला कवटाळून बाथरुममध्ये बसले अन्…

सो लापूरमधील एका टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत दोन राज्यातील प्रसिद्ध उद्योजकाचा कुटुंबासह होरपळून मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत हाजी उस्मान मंसुरी, अनस मंसुरी, शिफा मंसुरी, युसूफ मंसुरी या मंसुरी कुटुंबाचा होरपळून मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत या आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. हाजी उस्मान मंसुरी प्रसिद्ध उद्योजक होते. त्यांचा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये टॉवेल निर्मिताचा हा व्यवसाय विस्तारला होता.
दरम्यान राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे नेते वसीम बुऱ्हाण यांनी रविवारी संध्याकाळी सोलापूर अक्कलकोट रोडवर असलेल्या कारखान्यात भेट दिली. ते म्हणाले की, लोकांना वाचवता आले नाही हे दुर्देव आहे. सोलापूरच्या इतिहासात एवढी मोठी जीवितहानी कधीच झाली नाही त्याबाबत चौकशी करावी अशी मागणी आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे करणार करणार आहोत.
कारखान्याचे मालक हाजी उस्मान मंसुरी हे आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी मास्टर बेडरूममधील बाथरूममध्ये जाऊन लपले होते. त्यांचा दीड वर्षाचा नातू युसुफ याला काही होऊ नये यासाठी त्यांनी नातवाला मिठीत कवटाळून घेतले होते. पण या आगीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती, रेस्क्यू टीममध्ये काम केलेले माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोलापूरमधील घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोलापूरमध्ये अक्कलकोट मार्गावर एका टेक्सटाईल युनिटला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे.मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल, असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.