
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातून दोन मंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रिपदारून मुख्तार अब्बास नक्वी यांनी राजीनामा दिला.
तर आरसीपी सिंग यांनी जनता दल युनायडेटच्या (जेडीयु) कोट्यातील स्टील खात्याचा राजीनामा दिला. यापैकी मुख्तार अब्बास नक्वी हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोर धरते आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर भाजपनं उमेदवारीसाठी शिक्कामोर्तब केल्यानंतर आता उपरराष्ट्रपतीपदासाठीची चाचपणी सुरू झाली आहे. त्यामुळे मुख्तार अब्बास नक्वी यांच्या उमेदवारीचा विचार भाजपच्या गोटात सुरू असल्याची माहिती आहे. नक्वी हे भाजपचा अल्पसंख्याक चेहरा आहेत. त्याचप्रमाणे पुरोगामी आणि सुधारणावादी विचारांचे मुस्लीम नेते अशी त्यांची ओळख आहे. देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही नक्वी यांच्या उपराष्ट्रपतीपदी विराजमान होण्यामुळे सकारात्मक संदेश जाऊ शकतो. शिवाय सर्वधर्मसमभावाचं पालन केलं जात असल्याचाही संदेश यातून इतरांना दिला जाऊ शकतो, असा विचार भाजपश्रेष्ठी करत असल्याची चर्चा आहे.