पुरुषांच्या बरोबरीने महिला सर्व क्षेत्रांत त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित असणे ही फार समाधानाची बाब आहे. उच्च शिक्षणामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याने मनाप्रमाणे जगू शकतात. ही प्रगती करताना आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महिला विवाहित असेल किंवा एकटी; आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरते. कुशल नियोजन हा कोणत्याही यशाचा पाया असतो आणि तो आर्थिक बाबींनाही लागू पडतो. पैशाने पैसा वाढतो हे साधे तत्त्व लक्षात ठेवा. त्यासाठी बचतीबरोबर विचारपूर्वक गुंतवणूक करायला हवी. कर्जाचे प्रमाण कमीत कमी ठेवणे, विविध पर्यायांत पैसे गुंतविणे, विमा घेणे, आपल्या उद्दिष्टांनुसार काम करणे आणि आकस्मिक खर्चासाठी तयार राहणे असे उपाय करायला हवेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे आयुर्मान जास्त आणि जबाबदाऱ्याही अधिक असल्याने आर्थिक स्थिती चांगली ठेवणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असायला हवे. त्यासाठी काय करावे ते बघा.
आपत्कालीन निधी तयार करणे: जीवनात तातडीच्या खर्चाची वेळ कधी येईल हे सांगणे श्नय नसल्यामुळे त्यासाठी आपत्कालीन निधी तयार ठेवला पाहिजे. घरखर्चासह सर्व आवश्यक खर्च सहा महिने ते एक वर्षापर्यंत व्यवस्थित चालेल एवढी रक्कम या निधीत हवी असा सर्वसाधारण नियम असला, तरी महिलांबाबत त्यात आणखी विचार करावा लागतो. उदा. तुम्ही बाळंतपणासाठी घेतलेला ब्रेक. बहुतेक कंपन्या तो सहा महिन्यांसाठी देतात आणि त्या कालावधीत वेतनही दिले जाते. पण, तुम्हाला त्यापेक्षा जास्त रजा घ्यावी लागणार असेल, तर त्या स्थितीत हा निधी मदतीला येतो. त्यामुळे तुम्हाला वर्षभर चिंता करावी लागत नाही.
या काळात बाळाची काळजी घेण्याचा खर्च (लसीकरण आदी) तसेच घरेलू कामगारांची सेवा घेण्यासारखे खर्च उद्भवतात. आपत्कालीन निधी तुम्हाला तेव्हा उपयोगी पडतो. मुले मोठी होऊ लागली आणि त्यांची दहावी अथवा बारावीची परीक्षा जवळ आल्यावरही अनेक मातांना ब्रेक घ्यावा लागतो. तुमच्या कुटुंबातील मुले याला सामोरी जाणार असतील, तर तुम्ही त्याची तयारी आधीपासूनच केली पाहिजे. नवा जॉब मिळण्यापूर्वीच्या काळातील खर्च भागविणे या निधीमुळे श्नय होईल. या सगळ्यांचा विचार करून आपत्कालीन निधीतील रकमेचे प्रमाण निश्चित केले पाहिजे. हा निधी तयार करत असताना तुमची नेहमीची गुंतवणूकही चालू ठेवलीत तर फारच उत्तम. मात्र, हा निधी तयार करण्यासाठी तुमची बचत अथवा गुंतवणुकीला श्नयतो हात न लावणे चांगले.
दीर्घायुष्यासाठीचे नियोजन : निवृत्तीसाठी तुम्ही
जोडीदाराबरोबर बचत करत असाल तर चांगलेच. पण, एकट्या असाल, तर वेगळा विचार करावयास हवा. अशा महिलांसाठी निवृत्तीनंतरची रक्कम फार महत्त्वाची असल्याने त्याचे नियोजन तरुण वयापासूनच केले पाहिजे. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे आयुर्मान जास्त असल्याने त्यांना पैशांची गरजही दीर्घकाळ असते. पुरुषांच्या तुलनेत महिला सात वर्षे जास्त जगत असल्याचे हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधनातून समोर आले आहे. जोडीदार आणि तुमच्या वयात पाच वर्षांपेक्षा जास्त अंतर असेल, तर ही बाब जास्त लक्षात ठेवली पाहिजे. वय वाढल्यावर वैद्यकीय खर्च जास्त होऊ लागतात आणि त्याची तयारीही ठेवली पाहिजे. निवृत्तीसाठी पुरुषांनी 75-80 वर्षांचे आयुष्य, तर महिलांनी 85-90 वर्षांचे आयुष्य गृहित धरून आर्थिक नियोजन करणे योग्य ठरते.