स्तनाचा कर्करोग हा जागतिक स्तरावर स्त्रियांमध्ये आणि भारतामध्ये सर्वात जास्त आढळून येणारा कर्करोग आहे. वेळीच निदान व यशस्वी उपचारांमुळे कर्करोग बरा होऊ शकतो. स्त्रीच्या जीवनातील जवळजवळ प्रत्येक पैलूवर हा परिणाम करू शकतो.
कॅन्सर झालेल्या रुग्णाच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला पूर्वी कर्करोग झालेला असेल तर हा अनुवांशिक धोका आता जेनेटिक टेस्टद्वावारे ओळखता येतो.
चिपळूणमधील स्तन आणि स्त्री कर्करोग तज्ज्ञ/ऑन्को सर्जन डॉ. तेजल गोरासिया यांनी सांगितलं की, बीआरसीए जेनेटिक टेस्टिंगमध्ये BRCA1 आणि BRCA2 या चाचणीद्वारे एखाद्या व्यक्तीला अनुवंशिकतेमुळे होणाऱ्या कर्करोगाचा धोका कितपत आहे हे शोधणं शक्य आहे. स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची चिन्हे ओळखून वेळीच उपचार केल्याने मृत्यू दर कमी करता येतो.
स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं
स्तनांमध्ये गाठ होणे
स्तन आणि काखेमध्ये गाठ आढळून येणे हे एक प्रारंभिक लक्षण आहे ज्याकडे दुर्लक्ष करु नका
स्तनाच्या आकारात बदल
स्तनाचा आकार, संवेदनशीलता किंवा रचनेत बदल जाणवणे
स्तनाग्रातून होणारा असामान्य स्त्राव
स्तनाग्रातून जास्त आणि असामान्य स्त्राव हे देखील स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. काही वेळेस तो रक्तासारखा तर कधीकधी तो पिवळसर किंवा पाण्यासारखा दिसून येतो.
गळा किंवा काखेमध्ये सूज
गळा किंवा काखेमध्ये सूज येणे म्हणजे तुमचा स्तनाचा कर्करोग हा लिम्फ नोड्समध्ये (Lymph Nodes) पसरला आहे.
स्तनांमध्ये वेदना होणं
गाठ आढळून आलेला भाग अधिक संवेदनशील किंवा वेदनायक असल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका. स्तन आणि स्तनाग्राच्या बाजूची त्वचा वेगळी दिसणे, स्तनाग्रात बदल होणे व त्वचा कोरडी किंवा जाड झालेली आढळून येणे हे देखील स्तनाचा कर्करोगाचे लक्षण ठरु शकते.
नियमित स्वतः स्तन तपासणी मासिक पाळी येऊन गेल्यानंतर केल्यामुळे स्तनाचा कर्करोगाचे वेळीच निदान करणे सोपे होते. स्तनांना सूज येणं, स्तन लाल होणे, व्रण आले आहेत का याकडे लक्ष द्या. हाताच्या तीन बोटांनी स्तनांच्या वर, खाली, डाव्या-उजव्या बाजूला आणि त्यानंतर गोलाकार पद्धतीने पूर्ण स्तनांवर हात फिरवून पाहा. तीन बोटांच्या मदतीने काखेत हळूवार दाब देऊन पहा.
वेळेवर उपचार केल्यास कर्करोग बरा होतो. शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन यांसारख्या पारंपारिक पद्धतींबरोबरच, टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी सारख्या नवीन उपचारांनी आशादायक परिणाम मिळविता येतात. हे उपचार कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी तयार केले जातात आणि जेणेकरुन निरोगी पेशींना वाचविता येते.