भारतीय मसाल्याच्या पदार्थांपैकी एक महत्त्वाचा पदार्थ आहे कढीपत्ता . खाद्यपदार्थाला स्वाद येण्यासाठी आपण फोडणीत त्याचा आवर्जून वापर करतो. त्यामुळे भारतातील अनेक खाद्यपदार्थांमध्ये तुम्हाला कढीपत्त्याचा वापर दिसून येईल.
भारतात कढीपत्त्याची एक जुडी अतिशय स्वस्त किमतीला म्हणजे जास्तीत जास्त १० ते १५ रुपयांना मिळते. त्यात काही भाजीविक्रेते हिरव्या मसाल्याबरोबर (कोथिंबीर, हिरवी मिरची) कढीपत्त्याचे दोन-तीन टाळ अगदी फुकट देतात. पण, भारतात स्वस्त असलेला हा कढीपत्ता कॅनडामध्ये किती रुपयांना विकला जातो तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर, हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच. कारण- यात कॅनडात राहणाऱ्या भारतीय महिलेने तिथे कढीपत्त्याच्या एका जुडीची किंमत सांगितली आहे, ही किंमत जाणून तुम्हीही अवाक् व्हाल.
अनेक भारतीय परदेशांत राहत असले तरी त्यांना जेवण मात्र भारतीय पद्धतीचेच हवे असते. त्यामुळे एक तर ते घरी बनवतात किंवा बाहेर भारतीय पद्धतीचे हॉटेल शोधतात. पण, घरी बनवताना ते प्रत्येक खाद्यपदार्थासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी दुकानामध्ये जाऊन खरेदी करतात. अशाच प्रकारे कॅनडात राहणारी एक महिला घरात लागणाऱ्या भाजीच्या खरेदीसाठी तेथील एका भाजी मार्केटमध्ये गेलीय. यावेळी तिने कॅनडातील कढीपत्त्याची एक जुडी कितीला मिळतेय याची किंमत सांगितली आहे.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला कॅनडातील भाजी बाजारामध्ये विविध प्रकारच्या भाज्या खरेदी करतेय. यावेळी तिने कढीपत्त्याचे पॅक केलेले एक पॅकेट उचलले आणि त्यावरची किंमत सांगितली. आपल्याकडे १० ते १५ रुपयांना मिळणारी कढीपत्त्याची जुडी तिथे पॅकिंग स्वरूपात ४.५० डॉलर म्हणजे जवळपास पावणेतीनशे रुपयांना मिळत असल्याचे तिने सांगितले. साहजिकच आहे तिथे भाज्याच काय इतरही अनेक गोष्टींच्या किमती आपल्यापेक्षा जास्त असणार. कारण- रुपयांच्या तुलनेत डॉलरचा रेट जास्त आहे. त्यामुळे तिथे प्रत्येक गोष्टीची किंमत भारतापेक्षा जास्त आहे; तसेच तेथील लोकांचे राहणीमान महाग आहे. त्यामुळे भारतीयांसाठी कढीपत्त्याला मिळणारी ही किंमत अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे.
@canada_stories_with_renuka या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे; ज्यावर युजर्स एकापेक्षा एक भारी कमेंट्स करीत आहेत. एकाने लिहिले की, भारतात ३०० रुपयांत बाजार येतो. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, इकडे १० रुपयांच्या कोथिंबीरसोबत कढीपत्ता फुकट देतात. मेरा भारत महान! तिसऱ्या युजरने सल्ला देत लिहिले की, मग आता पुढच्या वेळेस जाताना इकडूनच कढीपत्त्याचे छोटेस रोपटे घेऊन जायचे अन् तिथे लावून घ्यायचे. त्यावर चौथ्या युजरने भन्नाट कमेंट केली आहे. माझी आई भाजीवालीकडून कढीपत्ता फ्रीमध्ये आणते, असे त्याने लिहिलेय.