अंगावर काटा आणणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिहारमधील बाढ रेल्वे स्टेशनवरील हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की रेल्वे अंगावरुन जात असताना एक महिला आपल्या शरीराची ढाल करुन दोन लहान मुलांचं संरक्षण करत आहे.
रेल्वे रुळावरुन जात असताना तिने आपल्या दोन्ही चिमुकल्यांना सुरक्षित ठेवलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला आणि तिची दोन लहान मुलं बेगुसराई येथून दिल्ली येथे निघाले होते. बागलपूर ते दिल्ली प्रवास करणारी विक्रमशीला एक्स्प्रेस रेल्वे फलाटावर आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने महिला तिच्या दोन मुलांसह रुळावर पडली.
तेथे असलेले लोक महिला आणि मुलांना मदत करु शकतील त्याआधीच रेल्वे स्टेशन सोडू लागली. त्यामुळे लोकांना काही करता आलं नाही. अशावेळी महिलेने आपल्या शरीराला ढाल करत दोन्ही मुलांचं संरक्षण केलं. रेल्वे आणि महिलेमध्ये अगदी काहीच इंचाचं अंतर असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. रेल्वे महिलेच्या जवळून जात असल्याचं दिसत आहे.
रेल्वे जेव्हा पुढे जाते तेव्हा लोक त्यांना वाचवण्यासाठी रुळावर उड्या मारतात. महिला आणि लहान मुलांना बाहेर काढलं जातं. महिला आणि लहान मुलांना त्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सदर घटनेमुळे आई आपल्या जीवाची पर्वा न करता मुलांचं संरक्षण करत असते हे पुन्हा सिद्ध झालंय.