संपात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार बंद असल्याने कुटुंब जगवायचे कसे? त्यामुळे वेगळा व्यवसाय
सोलापूर : संपात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार बंद असल्याने कुटुंब जगवायचे कसे? असा प्रश्न त्या कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी सोलापूर आगारात चालक पदावर काम करीत असलेले मोहोळ तालुक्यातील विरवडे बुद्रुक येथील सोमनाथ अवताडे यांनी पर्यायी व्यवसाय म्हणून म्हशींचे केस कापण्याचे काम सुरू केले आहे सिरो सर्व्हेचे निष्कर्ष : झोपडपट्टी भागात ज्येष्ठ नागरिक ठरताहेत कोरोनाचे लक्ष्य…
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे या मुख्य मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी मागील दोन महिन्यांपासून संपावर ठाम आहेत. या आंदोलन काळात अधिकाऱ्यांच्या पगारी मिळाल्या. परंतु वाहक-चालक यांच्या मात्र पगारी थांबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तुटपुंज्या पगारात आतापर्यंत कामावर राबवून घेतले. आता पगार बंद आहे. त्यामुळे आई-वडिलांचे आजारपण, मुलांचे शिक्षण, घर भाडे, बॅंकेचे हप्ते, कुटुंबाचा खर्च कुठून भागवायचा याची चिंता संपातील कर्मचाऱ्यांना सतावते आहे. शासनाकडून कायमच याकडे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप संपकरी कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत कामावर येणार नाही, अशी भूमिका अवताडे यांनी घेतली आहे.
संसाराचा गाडा चालविण्यासाठी
माझा हा व्यवसाय नसून मी एसटी महामंडळात कायम सेवेत आहे. आर्थिक परिस्थिती गंभीर होत असल्याने हे काम करीत आहे. सोलापूर आगारात सहा वर्षांपासून एसटीचालक म्हणून सेवेत आहे. संपकाळात इतर खासगी वाहने चालवून संसाराचा गाडा चालविला. मात्र, काम मिळाले नाही म्हणून पर्यायी व्यवसाय म्हणून म्हशींचे केस कापण्याचे काम करीत आहे. आठवड्यातून चार- पाच म्हशींचे केस कापण्याचे काम मिळत असते. एका म्हशीमागे १५० रूपये मिळतात. घरात आई-वडील, पत्नी व दोन मुले आहेत. त्यामुळे घरातील सर्व जबाबदारी माझ्यावर असल्याने मला हे काम करावे लागत असल्याचे श्री. अवताडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
माझा मित्र नाभिक समाजाचा असल्याने त्याच्यासोबत राहून म्हशीचे केस कापण्याचे काम शिकलो. तीन महिने पगार नाही. दोन मुलांसह संसार चालविणे अवघड बनल्याने नाईलाजास्तव हे काम करीत आहे.