राजकीय

पश्चिम महाराष्ट्रात 58 जागा स्वबळावर लढवणार


महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या कार्यकर्त्यांच्या सन्मानाची वेळोवेळी आठवण करून द्यावी लागते. महायुती सरकारने मागासवर्गीय समाजाचा निधी अन्यत्र वळवला.

त्यामुळे आमचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आदेश दिल्यास पश्चिम महाराष्ट्रातील 58 जागा स्वबळावर लढवण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांनी दिला

रिपाइंच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक सातार्‍यात शनिवारी झाली. त्यानंतर सरोदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड, सातारा तालुकाध्यक्ष आप्पा तुपे आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

 

सरोदे म्हणाले, महायुतीने गेल्या अडीच वर्षांमध्ये मागासवर्गीय समाजाच्या हिताविरोधात निर्णय घेतले आहेत. अनुसूचित जातींच्या वर्गवारीचा आदेश निघाल्यानंतर 15 ऑक्टोबरला त्याचा जीआर निघाला. त्याच दिवशी आचारसंहिता जाहीर झाली.

हा निर्णय दलित समाजाच्या विरोधातील आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढवण्यात आली नाही. एकूण बजेटच्या पाच टक्के निधी मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी वापरायचा असतो; परंतु हा निधी महायुती सरकारने अन्यत्र वळवला.

 

त्यामुळे हे सरकार दलितविरोधी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आमचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे महायुतीमध्ये आहेत. त्यांच्या कानावर ही बाब घालण्यात आली आहे.

त्यांनी भूमिका घेतल्यास, महाराष्ट्रातील सर्व 288 जागा लढण्यासाठी अर्ज घेण्याची आमची तयारी आहे. सात प्रादेशिक विभागांमध्ये आमचे कार्यकर्ते तयार आहेत. याबाबतचा अहवाल शुक्रवारी (दि. 25) ना. आठवले यांना सादर करण्यात येणार आहे.

सात प्रादेशिक विभागांपैकी पश्चिम महाराष्ट्राची पहिली बैठक आज झाली. कार्यकर्त्यांच्या मनोगतामधून नाराजी व्यक्त झाली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला कोणत्याही पक्षाने गृहीत धरू नये, अन्यथा त्यांना त्यांची जागा दाखवण्यास आम्ही कमी पडणार नाही. प्रसंगी पश्चिम महाराष्ट्रातील 58 जागा स्वबळावर लढवण्याची भूमिका आम्ही घेऊ. याबाबत ना. आठवले यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे सरोदे यांनी स्पष्ट केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *