मुंबई : राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आज दिल्लीत निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या सर्व 288 जागांवर मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
काय घेतला निर्णय ?
निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह असलेल्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह स्पष्ट दिसणार आहे. शरद पवारांची ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे, पण पिपाणी हे चिन्ह कायम राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हाला बंदी नसेल, हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
शरद पवारांनी काय केली होती मागणी
शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणुक आयोगाला पत्र देण्यात आलं, यात फ्री सिम्बॉलमधून पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती करण्यात आली होती. फ्री सिम्बॉलमध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा समावेश असल्यामुळे अडचणी येत असल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आला होता. तसेच तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा आकार वाढवण्याची मागणी शरद पवारांच्या पक्षाने केली होती.