महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीपासून वेगळा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबतची घोषणाच राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली.
विदर्भातील दर्यापूर, अमरावती, अचलपूर, बाळापूर, तिवसा, अकोला येथे रासपच्या संमेलनांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण राज्यात रासपची ताकद वाढली आहे. त्यामुळे पक्ष मजबूत करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून अत्यंत सक्षम उमेदवारांची विधानसभेसाठी निवड केली जात आहे. काही उमेदवारांची यादीही तयार आहे. उर्वरित उमेदवारांचीही वेळेत निवड केली जाईल, अशी निवडणूक नियोजनाची माहितीही जानकर यांनी यावेळी दिली.
राज्यातील सर्व 288 जागा आम्ही स्वबळावर लढवू, आमचे 23 आमदार निश्चित आहेत, अशी घोषणाच त्यांनी यावेळी केली. महायुतीपासून वेगळे होऊन विधानसभेच्या सर्व 288 जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केलेल्या जानकर यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या आघाडीत सहभागी होणार नसल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. तिसऱ्या आघाडीला विशेष राजकीय भवितव्य नसल्याचा दावाही महादेव जानकर यांनी केला.
महायुतीबद्दल द्वेष नाही
महायुतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेऊन ताकदीची चाचपणी करणार असलेल्या महादेव जानकर यांनी आपले महायुतीशी कोणतेही वैर नसल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीत रासपला राज्याच्या 40 जागा मिळाव्यात हा प्रस्ताव रासपने महायुतीला दिला आहे. मात्र, आजतागायत त्याची दखल घेण्यात आलेली नाही.