बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज बारामती, दौंड आणि इंदापूर दौऱ्यावर आहेत. अजित पवार हे डॉक्टर आणि वकिलांचा मेळावा घेणार असून इंदापूरपासून त्याची सुरुवात केलीय.
यावेळी त्यांनी डॉक्टरांचे प्रश्न समजून घेत त्यावर मार्ग काढू असं म्हटलं. पाचव्या टप्प्यापर्यंत आम्ही बिझी राहणार आहे. डॉक्टरांचे अनेक प्रश्न आहेत त्यातून मार्ग काढू असं म्हणाले. गर्भपात आणि मुलींच्या जन्मदराबाबत बोलताना अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बाहेरचे पवार या वक्तव्यावरून यावेळी टोला लगावला. डॉक्टरांशी बोलताना एका महिला डॉक्टरचे नाव घेत अजित पवार यांनी म्हटलं की, “तुम्ही सून म्हणून आला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही तुम्ही आमच्या लक्ष्मी आहे.”
गर्भपात आणि मुलींच्या जन्मदरावर बोलताना अजित पवार म्हणाले की, बीडमध्ये काय आणि किती प्रकार चालतात ते तुम्हाला माहितीय. पण अशा घटना घडू नये. काही जिल्ह्यात एवढी तफावत पडायला लागली की हजार मुलं ज्यावेळी जन्माला येतील साडे आठशे मुली जन्माला येत होते. सातशे नव्वदपर्यंयत हे प्रमाण आहे. भविष्यात तर सगळं अवघडच होणार आहे. पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल, असा प्रसंग त्यावेळी कधी येऊ शकतो. यातला गमतीचा भाग जाऊद्या. गंमत म्हणून मी त्याचा उल्लेख केला. मला कुणाचा अपमान करायचा नव्हता.
आम्ही लोकाभिमुख कामे करतो पण काही गोष्टीत आम्ही चुकू शकतो. काम करणारा चुकतो. जो कामच करीत नाही तर तो चुकेल कसा? 1991 साली नरसिंह राव यांनी मला सांगितले की अजित तुला विश्वासदर्शक ठराव झाला की तुला राजीनामा द्यायचा आहे. तुला आमदारकी लढवावी लागेल असं म्हणत अजित दादांनी त्यांच्या आमदारकीचा किस्सा सांगितला.
मी विकास करणारा माणूस आहे. मी अनेक पंतप्रधान पाहिले. मी मोदींना विरोध करीत होतो. त्यांच्या सारखा माणूस सारखा सारखा मिळत नाही. अनेक कामे त्यांनी केली. एका बाजूला नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला कोणताही चेहरा नाही, पण राहुल गांधी आपण धरू. काय चित्र दिसतं तुम्हाला? असा प्रश्नही अजित पवार यांनी विचारला.
सरकारमध्ये कामासाठी गेलो मी सत्तेला हापापले नाही. माझ्या एवढं पाच वेळा उपमुख्यमंत्री होईल असं वाटत नाही. मीच आताच्या खासदारासाठी मते मागितली. पण कोणताही केंद्राचा प्रोजेक्ट इथे आला नाही. हर्षवर्धन पाटील आमच्या महायुतीचे घटक झाले आहेत. ते आपल्याला डॉक्टरांचे प्रश्न सोडवायला मदत करतील.
माणूस खरा कुणाशी बोलतो तर डॉक्टरशी. जरा त्यांच्याशी बोला. काय चालले आहे विचारा, आमचे नाव घेतलं तर जरा चांगले बोला जर दुसरे नावं घेतलं तर जोरात इंजेक्शन द्या अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली. वाडप्या घराचा असला की कितीही वाढता येतं. आता मी वाढपी आहे. तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला साथ देईल. आतापर्यंत खासदाराला निवडून दिले. तुम्ही आता महायुतीच्या खासदाराला निवडून दिले तर त्याची कारकीर्द आजपर्यंत जे खासदार निवडून गेले आहेत त्यांच्या पेक्षा महायुतीच हा खासदार उजवा असेल असंही अजित पवार म्हणाले.