Maratha Aarakshan : मनोज जरांगे यांच्या मातोरी गावात दंगल ! मुख्यमंत्री मराठा आंदोलकांना रेड कार्पेट टाकतात परंतु ओबीसींच्या आंदोलनाची ते साधी दखलही घेत नाहीत
मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी गावात रात्री अचानक दंगल उफाळून आली. ओबीसी आणि मराठा समाज आमने सामने आले. अनेक दुचाकींची तोडफोड करण्यात आली. यावेळी झालेल्या दगडफेकीत अनेक जखमी झाले.
ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी वाजवण्यात आलेल्या डीजेवरून हा वाद झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मातोरी गावात सध्या प्रचंड तणाव असून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी उपोषण करणारे प्रा. लक्ष्मण हाके हे सध्या अभिवादन दौर्यावर असून ते आज भगवानगडावर दर्शनासाठी जाणार होते. पाडळशिंगी येथे त्यांचे स्वागत करण्यासाठी तिंतरवणी, माळेगाव, पारगावचे ग्रामस्थ डीजे घेऊन निघाले होते. डीजे मातोरीत येताच घोषणाबाजीला सुरूवात झाली. मातोरी येथील ग्रामस्थांनी डीजे बंद करून गावातून बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी दोन्ही बाजूने शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यवसान दगडफेकीत झाले.
दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. डीजेची मोडतोड करण्यात आली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींवर मोठमोठे दगड टाकण्यात आले. दगडफेक झाल्याचे कळताच आसपासच्या गावातून झुंडीच्या झुंडी मातोरीकडे निघाल्या. भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या मातोरी या चिमुकल्या गावात सध्या हजारोंचा जमाव जमला आहे. घटनेची माहिती कळताच बीड पोलिसांनी दंगाकाबू पथकासह प्रचंड फौजफाटा मातोरीकडे रवाना केला.
मुख्यमंत्री ओबीसींची दखलही घेत नाहीत, प्रा. हाके यांचा आरोप
मातोरीतील दगडफेकीच्या घटनेमुळे प्रा. लक्ष्मण हाके यांना भगवान गडावर पोहोचण्यास उशीर झाला. मोठ्या बंदोबस्तात प्रा. हाके भगवान गडावर दाखल झाले. त्यांनी भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री मराठा आंदोलकांना रेड कार्पेट टाकतात परंतु ओबीसींच्या आंदोलनाची ते साधी दखलही घेत नाहीत, असा आरोप केला.