मनोज जरांगेंच्या सभेपूर्वी बीडमधील 125 मराठा आंदोलकांना पोलिसांची नोटीस
बीड : मनोज जरांगे पाटील यांची बीड (Beed) शहरात 23 डिसेंबर रोजी निर्णायक इशारा सभा होत असून, याच सभेच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांकडून 125 मराठा आंदोलकांना ( Maratha Protestors) नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.
सोबतच जाळपोळ आणि दगडफेकीत जामीन मिळालेल्या आंदोलकांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे जरांगे यांच्या सभेपूर्वी बीड पोलीस ॲक्शन मोडवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
23 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये निर्णायक इशारा सभा होणार असून, याच सभेपूर्वी बीड पोलिसांनी 125 मराठा आंदोलकांना नोटीसा पाठवले आहेत.यामध्ये बीडमध्ये जी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली होती, याप्रकरणी जामीन मिळालेल्या आंदोलकांना देखील नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन…
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 400 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, सभेमध्ये कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी म्हणून 125 मराठा आंदोलकांना देखील नोटीसा बजावल्या आहेत. तर, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना कायद्याने दिलेल्या अधिकाराप्रमाणेच आंदोलन करून कायदा व सुव्यवस्था राखावी असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आले आहेत. तर, वैयक्तिक किंवा शासकीय मालमत्तेचं नुकसान होणार नाही याची देखील काळजी घेण्याचं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केली सभास्थळाची पाहणी
23 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये इशारा सभा होणार असून, बीड बायपास रोडवर या सभेचे तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. याच सभास्थळाची पाहणी छत्रपती संभाजीनगरच्या विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केली आहे. यावेळी बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांनी सभेच्या ठिकाणी असलेल्या नियोजनाची आयोजकांकडून माहिती जाणून घेतली. तसेच, काही सूचना देखील दिल्या. यासोबतच सभेच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईची देखील त्यांच्याकडून माहिती घेण्यात येण्याची शक्यता आहे.
सभेला येणारे मराठा बांधव आणि इतर नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्याचबरोबर धुळे-सोलापुर या महामार्गाच्या बाजूलाच ही सभा होणार असल्याने, महामार्गावरची वाहतूक देखील वळवण्यात आली आहे. मात्र, महत्त्वाच्या वाहनांना या मार्गावरून जाता येणार आहे. त्यामुळे, त्यांना देखील काही त्रास होणार नाही अशा सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सभेच्या आयोजकांना दिलाय आहेत. तसेच, सभेसाठी बीडसह बाहेर जिल्ह्यातील पोलीस देखील बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले आहेत. तर, सभेदरम्यान उपद्रवी लोकांवर पोलिसांची नजर असल्याची माहिती ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली आहे.
भाजप आमदार अमित त्यागी यांनाही जेएन.1 या कोरोना विषाणूची लागण,केंद्राकडून अलर्ट