मराठा आरक्षणमहाराष्ट्र

“मराठा समाजाच्या मागण्या योग्य, पण.”; मराठा आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट विधान


गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज हा सातत्याने आरक्षणाची मागणी करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.

“मराठा समाजाला त्यांचे अधिकार आणि आरक्षण हे मिळायलाच हवं, असं आमच्या सरकारचे वचन आहे. मराठा समाजाच्या मागण्या या योग्य आहे. त्यातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नवी मुंबईत बोलत होते.

 

देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांची 91 वी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारंभ आणि माथाडी कामगारांचा भव्य मेळावा पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबद्दल एक मोठे वक्तव्य केले.

 

“दुर्दैवाने त्यानंतर ते टिकू शकले नाही”

“दरवर्षी अण्णासाहेब पाटील यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण इथे जमतो. मराठा समाजाची चळवळ उभी झाली ती अण्णासाहेब पाटील यांच्या निमित्ताने उभी झाली. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. देशात मराठा आरक्षण हे एकमेव आरक्षण होते, जे उच्च न्यायालयात आपण टिकवून दाखवलं. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा सर्वोच्च न्यायालयातही ते टिकलं. पण दुर्दैवाने त्यानंतर ते टिकू शकले नाही”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

“मराठा समाजाची पिळवणूक आणि फरफट होता कामा नये”

“पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 10 टक्के आरक्षण दिलं. मोदींनीही EWS चेही आरक्षण दिलं. त्याचाही फायदा मराठा समाजाला झाला. पण सातत्याने वेगळ्या आरक्षणाची मागणी होत असल्याने शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही 10 टक्के आरक्षण दिले. आज वेगवेगळ्या मागण्या होत आहेत, त्या चुकीच्या आहेत असं मी म्हणणार नाही. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण जी कोणतीही मागणी ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे, अन्यथा आपण एखादा निर्णय घ्यायाचा आणि कायद्याच्या चौकटी बसला नाही म्हणून तो निर्णय न्यायालयाने रद्द करायचा, अशाप्रकारे वारंवार पिळवणूक आणि फरफट मराठा समाजाची होता कामा नये. त्यामुळे यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्हीही करत आहोत”, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

 

“समाजात दुफळी निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न”

“कारण मराठा समाजाने विविध समाजाचे नेतृत्व केलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे १८ पगड जातीचे मावळे एकमेकांविरोधात उभे आहेत, अशाप्रकारचे चित्र उभं राहणं हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही. ते उभं होऊ नये, असा सर्वांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आमच्या सरकारचे वचन आहे की मराठा समाजाला त्यांचे अधिकार आणि आरक्षण हे मिळायलाच हवं. पोलीस भरतीतही मराठा आरक्षण दिले. मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळायला हवं, तसेच त्यावेळी समाजात कुठेही दुफळी निर्माण होऊ नये. या दृष्टीने आमचा सातत्याने प्रयत्न आहे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *