मोदी सरकारने महाराष्ट्रातील शंभर वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला अखेर मंजुरी दिली आहे. १९०८ साली पहिल्यांदा प्रस्तावित झालेल्या या ३०९ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी १८,०३६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
हा नवीन रेल्वे मार्ग महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, तसेच मध्य प्रदेशातील बरवणी, खरगोन, आणि धार या आदिवासी भागांना जोडणार आहे, ज्यामुळे या भागात विकासाची मोठी संधी निर्माण होणार आहे.
मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग उज्जैनमधील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांना जोडणार असून, उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठा उपलब्ध करून देणार आहे. तसेच, या रेल्वेमार्गामुळे मुंबई ते नवी दिल्ली आणि पुणे ते इंदूर या मार्गांवरील अंतर अनुक्रमे १३६ किलोमीटर आणि ३२० किलोमीटरने कमी होणार आहे, ज्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होईल आणि रेल्वे बोर्डाच्या इंधन खर्चात दररोज दोन कोटी रुपयांची बचत होऊ शकते.
धुळ्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या घोषणेचा मोठा जल्लोष साजरा केला. माजी खासदार सुभाष भामरे यांच्या नेतृत्वात फटाके फोडण्यात आले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. या नवीन रेल्वे मार्गामुळे धुळे, मालेगाव, आणि मध्य प्रदेशातील अविकसित भागात औद्योगिकीकरणाला चालना मिळून विकासाचा मार्ग मोकळा होईल.