मनोज जरांगेंच्या बाजूलाच ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण; अंतरवालीत होणार हायहोल्टेज ड्रामा
जालना : मराठा आरक्षणाचा तीढा अद्याप सुटलेला नाही. सगेसोयरेसह अन्य मागण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे हे पुन्हा आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. तर आता आंतरवाली सराटीत ओबीसी आरक्षण बचावासाठी प्रा. लक्ष्मण हाके हे देखील आमरण उपोषणास सुरुवात करणार आहेत.
परवानगी नाकारली तरी देखील आपण लढणार, असा निर्धार हाके यांनी केल्याने पुन्हा एकदा या भागातील वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. अंतरवालीत उद्यापासून हायहोल्टेज ड्रामा पहायला मिळू शकतो.
चळवळीतील कार्यकर्ता अशी लक्ष्मण हाके मूळ ओळख आहे. हाके हे सुरुवातीला राज्य मागास आयोगाचे सदस्य होते. मात्र मराठा आरक्षण आंदोलनात त्यांनी शासनाच्या भूमिकेच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा देऊन ओबीसी चळवळीचे काम सुरु केले. याचवेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते केले होते.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर लक्ष्मण हाके यांनी आपली भूमिका मांडत म्हणाले की, आंतरवली सराटी हे सत्ताधाऱ्यांचे आवडीचे गाव असावे म्हणूनच राज्यातील 12 कोटी जनतेची जबाबदारी असणारे शासन येथे उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांचे लाड करीत आहे. त्याचवेळी ओबीसी आरक्षण बचावासाठी आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आंदोलने करूनही शासनाने त्यांच्याकडे कधी ढुंकून देखील पहिले नाही, असा आरोप हाके यांनी केला.
लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, हे सरकार कायम ओबीसींना दुय्यम वागणूक देत असल्याने मी आता आंतरवाली सराटीमध्येच आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या गावाचा त्यासाठी मला आग्रह होत असून आम्ही सनदशीर मार्गाने येथे उद्यापासून आमरण उपोषणाला सुरुवात आहोत. यासाठी परवानगी मागणारा अर्ज देखील दिला असून परवानगी देऊ अथवा न देऊ दे आम्ही आमच्या घटनेने दिलेल्या अधिकारानुसार हे आमरण उपोषण करणार असून यात आमचा जीव गेला तरी हरकत नसल्याचा दावा हाके यांनी केला.