मी संत महात्मे आणि देवीदेवतांना मानणारा आहे,”तुकाराम महाराजांबाबत सपशेल माफी पण बारस्कर हा भोंदू”
मुंबई : तुकाराम महाराजांबाबत सपशेल माफी मागतो, पण अजय बारस्कर हा भोंदू आहे, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत. मराठा आंदोलनकर्ते आणि किर्तनकार अजय महाराज बारस्कर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत जरांगेंवर अनेक आरोप केले.
यावर आता जरांगेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
मनोज जरांगेंनी तुकाराम महाराजांचा अपमान केल्याचा आरोप अजय महाराज बारस्कर यांनी केला होता. यावर जरांगे म्हणाले की, “तुकाराम महाराजांबाबत माफी मागतो. त्यांच्यासाठी प्रायश्चित्तसुद्धा करेन. संत तुकाराम महाराजांबाबत माझ्या तोंडून काही शब्द गेले असतील. उपोषणाच्या वेळी चिडचिड असते त्यावेळी झालं असेल. त्यामुळे मी यासाठी मागतो. मी संत महात्मे आणि देवीदेवतांना मानणारा आहे. मी वारकरी संप्रदायाला मानतो. मी विद्रोही नाही. त्यामुळे महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल मी सपशेल माफी मागतो.”
“अजय महाराज बारस्कर यांचे आरोप हा ट्रॅप आहे. आतापर्यंत सहा महिने मी गोड होतो. हा सगळा मला बदनाम करण्याचा प्रयत्न असून यात मुख्यमंत्री शिंदेंचादेखील प्रवक्ता आहे. ज्याला फेसबूक लाईव्हचे लोकं विचारत नाही, त्याला माध्यमं कसं काय विचारायला लागलेत?” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “समाजासोबत तुम्ही प्रामाणिक रहा. गद्दारीचा शिक्का मारून घेऊ नका. तो कशाचा महाराज आहे. ते बांधावरुन उठले आणि महाराज झाले. जो घरापर्यंत येतो तो खरंच महाराज असू शकतो का. ते भोंदू आहेत,” असेही ते म्हणाले आहेत.