लातूर : शेतात सतत एकच एक पीक घेतले गेल्यानंतर शेतकरी नांगरणी करतात त्याला पलटी म्हणतात. पाच वर्षांपूर्वी नगर पंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील चारही नगर पंचायती भाजपच्या ताब्यात होत्या .
राज्यात सत्ता बदल झाल्याने मतदारांनी भाजपला पलटी देत काँग्रेसला विजयी केले आहे व चारपैकी केवळ एकाच नगर पंचायतीत भाजपला सत्ता कायम राखता आली.
शिवसेना, भाजप मतविभाजनाचा राष्ट्रवादीला फायदा
राज्यात भाजपची सत्ता असताना लातूर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा सर्व ठिकाणी भाजपने एक हाती सत्ता मिळवली होती. यंदा नगर पंचायतीत चित्र बदलले. चार नगर पंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला धोबीपछाड देत बालेकिल्ला असलेल्या देवणी व जळकोट नगर पंचायतीत केवळ भाजपला एक जागा मिळाली आहे. देवणी नगर पंचायत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे तर जळकोटमध्ये महाविकास आघाडीने विजय प्राप्त केला आहे. या दोन्ही नगर पंचायतीत भाजपचे विद्यमान नगराध्यक्षही पराभूत झाले, त्यामुळे भाजपला आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. शिरूर आनंतपाळ नगर पंचायत भाजपने आपल्या ताब्यात ठेवली असली तरी या नगर पंचायतीत भाजपला काठावरचे बहुमत आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपली ताकद या नगर पंचायतीत वाढवली आहे . चाकुर नगर पंचायतीत भाजपचा नगराध्यक्ष होता, राज्यात सत्ता असल्याने भाजपने डावपेच आखत याठिकाणी नगराध्यक्षपद मिळवले होते.
नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे . २०१७ च्या नगर पंचायत निवडणुकीत भाजपने ३७ जागा जिंकलेल्या होत्या. यावेळी तो आकडा खाली येत केवळ चौदा जागेवर भाजपला समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसचे संख्याबळ ११ वरून २३ तर राष्ट्रवादी सहावरून १४ पर्यंत संख्याबळ वाढले.
या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल पालकमंत्री अमित देशमुख व राज्यमंत्री संजय बनसोड यांनी समाधान व्यक्त करत जनतेचे आभार मानले आहेत. तर भाजपचे निलंगा चे आमदार व माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी महाविकास आघाडीचे सर्व घटक एकत्र झाल्याने त्यांना विजय मिळाल्याचा दावा केला.