ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याबद्दल तरुणाला १० वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा


पुणे : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याबद्दल तरुणाला १० वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पॉक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी ही शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद आणि पळवून नेल्याबद्दल ३ वर्षे सक्तमजुरी, १५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. दोन्ही शिक्षा आरोपीने एकत्र भोगायच्या आहेत.

ब्रिजेश फुलसिंग परिहार (वय २८ वर्षे, रा. मूळ गाव सहुना, पो. पिछोली, डबरा, जि. ग्वालियर, मध्य प्रदेश) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. घटनेच्या वेळी आरोपी हा लोणावळा येथील एका हॉटेलमध्ये नोकरीला होता. १७ वर्षांची पीडित मुलगी आईसमवेत हॉटेलमध्ये कामाला जात होती. तिथे आरोपीची आणि तिची ओळख झाली. १ नोव्हेंबर २०१४ ला आरोपी मुलीला घेऊन लोणावळा येथील भुशी डॅम परिसरात गेला व तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले आणि तिला कुणालाही न सांगण्याबाबत धमकावले. आरोपी तिला ग्वालियर मध्य प्रदेशला आपल्या घरी घेऊन गेला. तिचे वय १९ वर्षे असल्याचे सांगत तिच्याशी मंदिरात जाऊन लग्न केले आणि वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले.

पीडिता घरी न आल्याने तिच्या आईवडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन.आर. गायकवाड यांनी केला. तपासादरम्यान आरोपी आणि पीडिता मध्य प्रदेशला त्याच्या घरी आढळून आले. पीडितेने दिलेल्या जबाबावरून आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत कलमांची वाढ करण्यात आली.

सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण सात साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यामध्ये पीडिता, तिच्या शाळेचे मुख्याध्यापक, पोलीस नाईक वैशाली लोखंडे आणि तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक एन.आर. गायकवाड यांची साक्ष महत्त्वाची ठरली. पीडितीने तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार झाल्याचे व आरोपीने जबरदस्तीने विवाह केल्याचे सांगितले. तसेच विवाह नोंदणी प्रमाणपत्रावरील सही तिची नसल्याचे सांगितले. अगरवाल यांनी उपलब्ध पुराव्यावरून पीडिता अल्पवयीन असल्याचे व आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केल्याचे तसेच आरोपीचा बचाव खोटा असल्याचा युक्तिवाद केल्याने न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *