क्राईमताज्या बातम्या

विक्रीसाठी आणलेले १४ पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त


पिंपरी : मध्य प्रदेशातून पिंपरी चिंचवड शहर परिसरात विक्रीसाठी आणलेले १४ पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. अग्निशस्त्रांची तस्करी करणाऱ्या सराईतासह याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली.
यातील एका आरोपीकडून यापूर्वी देखील २४ अग्निशस्त्रे (पिस्तूल) आणि १६ जिवंत काडतुसे पोलिसांनी पकडली होती. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली.

आकाश अनिल मिसाळ (वय २१, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), रुपेश सुरेश पाटील (वय ३०, रा. वडगाव बुद्रुक, ता. चोपडा, जि. जळगाव), ऋतिक दिलीप तापकीर (वय २६, रा. सुतारवाडी, पाषाण), अजित उर्फ विकी रामलाल गुप्ता (वय २८, रा. भोसरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वडमुखवाडी येथे काहीजण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून दरोडा विरोधी पथकाने ३ जानेवारीला रात्री तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकी, दोन पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल फोन, मिरची पूड, नायलॉन दोरी, असा ऐवज पोलिसांनी जप्त केला. आरोपी एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. त्यानुसार त्यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गुन्ह्यात आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.

पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी आरोपींच्या घराची झडती घेतली. त्यावेळी रुपेश पाटील आणि ऋतिक तापकीर यांच्या फ्लॅटमधून सहा गावठी कट्टे आणि जिवंत काडतूस मिळाले. आकाश मिसाळच्या घरातून चार गावठी कट्टे आणि जिवंत काडतूसे मिळाले. रुपेश पाटीलने भोसरीतील अजित गुप्ता याला पिस्तूल विकले असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी अजित गुप्ताला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. या कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण १४ पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे, असा एकूण चार लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सहाय्यक पोलीस आयुक्त पदमाकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस कर्मचारी महेश खांडे, उमेश पुलगम, नितीन लोखंडे, आशिष बनकर, सागर शेडगे, गणेश कोकणे, राजेश कौशल्ये, राहुल खारगे, विक्रांत गायकवाड, राजेंद्र शिंदे, औदुंबर रोंगे, गोविंद सुपे, नागेश माळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

आरोपी रेकाॅर्डवरील गुन्हेगार

आरोपी रुपेश पाटील आणि अक्षय मिसाळ हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. रुपेश पाटील आणि त्याच्या साथीदारांवर यापूर्वी देखील पोलिसांनी कारवाई केली आहे. पूर्वीच्या कारवाईमध्ये रुपेश पाटील आणि टोळीकडून २४ पिस्तूल आणि १६ जिवंत काडतुसे जप्त केली होती. आरोपी रुपेश पाटील हा अग्निशस्त्रांचा तस्करी करणारा सराईत गुन्हेगार आहे. तो नेहमी वेगवेगळ्या साथीदारांसह अग्निशस्त्रांची तस्करी करतो. रुपेश पाटील भोसरी आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यात फरार होता. तर त्याच्यावर चिंचवड, देहूरोड आणि भोसरी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपी आकाश मिसाळ याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *