वाहनचालकांच्या मदतीने जिल्ह्याच्या वेगवेगळय़ा आगारातून १४२ बसगाडय़ा रस्त्यावर उतरल्या सध्या १२०० कर्मचारी कामावर रुजू
नाशिक: विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेला राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप कामगार न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला असला तरी संपकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दुसरीकडे, संप बेकायदेशीर ठरविल्याने महामंडळ प्रशासनाच्या आशा पल्लवित झाल्या असून जिल्ह्यात खासगी वाहनचालकांच्या मदतीने १४२ बसगाडय़ा रस्त्यावर उतरल्या आहेत.
तसेच सध्या १२०० कर्मचारी कामावर रुजू झाले असल्याचा दावा विभाग नियंत्रकांकडून करण्यात आला आहे. असे असले तरी नाशिक (दोन) तसेच मनमाड या आगारातून अद्याप एकही बस बाहेर पडलेली नाही.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपास अडीच महिन्याहून अधिकचा कालावधी झाल्यानंतरही संप सुरूच आहे. राज्य सरकारकडून आतापर्यंत अनेक वेळा संपकऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन करूनही संपकऱ्यांवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. संप अधिक दिवस सुरु राहिल्याने संपकऱ्यांच्या घरातील अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. राज्य सरकार आपली मागणी मान्य करणार, या आशेत असलेल्या संपकऱ्यांना मुंबई येथील कामगार न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरविल्याने धक्का बसला आहे.
दुसरीकडे, महामंडळाच्या वतीने सात दिवसांपूर्वी खासगी बसचालकांच्या मदतीने जिल्ह्यात बससेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी ठेकेदाराकडे ५० वाहनचालकांची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्यापही ठेकेदाराकडून पूर्ण क्षमतेने वाहनचालक उपलब्ध होऊ शकलेले नाही. यामुळे मंगळवारी पुन्हा वाहनचालकांची परीक्षा घेण्यात आली. ही प्रक्रिया सुरूच राहील, असे विभाग नियंत्रक मुकुंद कुवर यांनी सांगितले.
मंगळवारी खासगी वाहनचालकांच्या मदतीने जिल्ह्याच्या वेगवेगळय़ा आगारातून १४२ बसगाडय़ा रस्त्यावर उतरल्या. मधल्या काळात ही संख्या कमी झाली असली तरी पुढील काळात हे चित्र बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कर्मचारी कामावर रुजू होण्याचे प्रमाणही वाढत असून सध्या १२०० कर्मचारी रुजू झाले असल्याचे कुंवर यांनी सांगितले. जिल्ह्याच्या अनेक आगारातून अल्प प्रमाणात का होईना बससेवा सुरू झाली असली तरी मनमाड आणि नाशिक (दोन) या आगारातून अद्यापही बससेवा सुरू झालेली नाही. दरम्यान, महामंडळाच्या वतीने कर्मचाऱ्यांवर निलंबन, बडतर्फ अशी कारवाई केली जात आहे. कर्मचाऱ्यांचा संप कामगार न्यायालयाने बेकायदेशीर ठरविण्यात आला असला तरी कर्मचारी संप सुरु ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. न्यायालयात कर्मचाऱ्यांची बाजू योग्य पद्धतीने न मांडल्यामुळे आजही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू असल्याचे संपकऱ्यांचे म्हणणे आहे. राज्य सरकारने कामावर परतण्यासाठी तीन वेळा इशारा दिला आहे. अशा स्थितीत नोकरी जाण्याची वेळ आली आहे. कामावर रुजू झाल्यास कारणे दाखवा नोटीस तर, कामावर रुजू न झाल्यास नोकरी जाण्याची भीती कर्मचाऱ्यांना आहे.
संप बेकायदेशीर ठरविल्याने महामंडळ प्रशासनाच्या आशा पल्लवित झाल्या असून जिल्ह्यात खासगी वाहनचालकांच्या मदतीने १४२ बसगाडय़ा रस्त्यावर उतरल्या आहेत.