मुंबई : ( व्रत्तसंस्था ) येथील नेव्हल डॉकयार्डमध्ये INS रणवीर जहाजावर स्फोट झाला असून या घटनेत नौदलाचे 3 जवान शहीद झाले आहेत. दरम्यान स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.ही युध्दनौका मुंबईच्या नौदलाच्या बंदरात होती. मात्र यामध्ये युद्धनौकेची मोठी हानी झाल्याचे वृत्त अद्याप तरी नाही. (INS Ranvir Blast)
संध्याकाळच्या सुमारास प्रथम या युद्धनौकेच्या अंतर्भागातील एका केबिनमध्ये आग लागली. आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु झाले असतानाच तेथे मोठा स्फोट झाला व त्यात 11 नौसैनिक जखमी झाले. त्यातील तिघांचा नंतर मृत्यू झाल्याचे वृत्त संरक्षण विभागाने दिले आहे. इतर जखमींवर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
INS रणवीर पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होते आणि लवकरच बेस पोर्टवर परत येणार होते. या घटनेमागील कारण तपासण्यासाठी चौकशी मंडळाला आदेश देण्यात आले आहेत असे, भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.स्फोट झाल्यानंतरही युद्धनौकेवरील कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. स्फोट झाला असला तरी त्यात युद्धनौकेची मोठी हानी झाली नाही, असेही सांगण्यात येत आहे. हा स्फोट या युद्धनौकेतील शस्त्रागारात झाला नसून तो नौकेच्या अन्य सामुग्रीचा असल्याचाही सांगितले जात आहे. आगीच्या व स्फोटाच्या कारणांची नौदलातर्फे उच्चस्तरीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. मृतांची नावे अद्याप जाहीर करण्यात आली नाहीत.राजपूत वर्गातील युद्धनौकांची पुढची आधुनिक आवृत्ती असलेली रणवीर वर्गातील ही विनाशिका 1986 मध्ये नौदल ताफ्यात समाविष्ट करण्यात आली होती. ही युद्धनौका नौदलाच्या पूर्व विभागाच्या ताफ्यातील असून नोव्हेंबर 2021 पासून ती पश्चिम विभागात तात्पुरती तैनात करण्यात आली होती. लौकरच ती तिच्या पूर्व विभागातील मूळ तळावर परत जाणार होती, मात्र त्यापूर्वीच तिला या दुर्घटनेने गाठले. यापूर्वीही मुंबईच्या नौदल गोदीत मोठे अपघात होऊन त्यात एका युद्धनौकेची व पाणबुडीची मोठी हानी झाली होती. या अपघातांमध्ये जिवीतहानीदेखील झाली होती.