बीड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्यावर गुन्हा दाखल
बीड जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यातच ओमिक्रॉनचा धोकाही वाढला आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळं धार्मिक, राजकीय कार्यक्रमाला बंदी घालण्यात आली आहे.नियमांना हरताळ फासल्याचा प्रकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमात घडला आहे.
नियमांची बंदी फक्त नावापुरतीच आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. असं असतानाच बीड जिल्ह्यातील नांदुरघाट येथे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाला हजारो लोक एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी सोशल डिस्टन्सिग आणि कोरोना नियमांचा अक्षरशः फज्जा उडाल्यानं कार्यक्रमाचे आयोजक असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्यावर केज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात संचारबंदी आणि जमावबंदी आदेश लागू असून, कोविड-19 संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव पसरवण्याचा संभव होऊ शकतो, हे माहिती असताना देखील स्वतःच्या आणि इतरांच्या जिवाची पर्वा न करता हयगय आणि निष्काळजीपणा करून सोशल डिस्टन्सिगचे पालन न केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज पोलीस ठाण्यात कलम 188,269,270,17,51 (B)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.