इस्लामाबाद: पाकिस्तानच्या एका पायलटनं रविवारी सौदी अरेबियाची राजधानी रियाधहून विमान उड्डाण करण्यास नकार दिला.
पाकिस्तानी इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या पायलटनं विमान प्रवास सुरू असताना मध्येच उड्डाण करण्यास असमर्थतता दर्शवली. त्यामुळे विमानातील प्रवासी संतापले. त्यांनी विरोध दर्शवला आणि विमानातून उतरण्यास नकार दिला. पाकिस्तानी इंटरनॅशनल एअरलाईन्सनं दिलेल्या माहितीनुसार, पीके-९७५४ विमानानं रियाधहून उड्डाण केलं. मात्र हवामान खराब असल्यानं ते दम्मममध्ये उतरलं. त्यानंतर विमानाच्या कॅप्टननं इस्लामाबादला जाण्यास नकार दिला. कामाचे तास संपल्याचं त्यानं सांगितलं.
कॅप्टननं दिलेलं कारण ऐकून प्रवासी संतापले. त्यांनी विमानातून उतरण्यास नकार दिला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विमानतळावरील सुरक्षा रक्षकांना बोलवावं लागलं. ‘सुरक्षित विमान प्रवासासाठी वैमानिकांना ठराविक वेळ आराम करणं गरजेचं आहे. तशी व्यवस्था करण्यात आली आहे,’ अशी माहिती पाकिस्तानी इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांनी दिली.