विधानसभा निवडणूक जाहीर होताच प्रचारसभांचा धुरळा उडाला आहे. याच दरम्यान पक्षाच्या चिन्हावरुन वाटाघाटी सुरू असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी पक्षाचं चिन्हं हे घड्याळच राहणार आहे.
सुप्रीम कोर्टानं अजित पवारांना दिलासा दिला आहे.
शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या पक्षाचं चिन्हं घड्याळ वापरण्याची परवानगी देऊन नये अशी मागणी केली होती. ही मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. तूर्तास तरी अजित पवार गटाकडे घड्याळ चिन्ह राहणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय आहे.
अजित पवार गटाचं चिन्हं हे घड्याळ राहणार आहे. शरद पवार गटाकडून करण्यात आलेली याचिका स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ‘घड्याळ तेच वेळ नवी’ दादांचं वाक्य अखेर ठरलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह दिले. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मागील काही महिन्यांपासून या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली जात होती. आज निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी झाली.
आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह आणि नावाबाबतच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. हे प्रकरण वादसूचित नसल्याने त्याचा उल्लेख वकिलांनी केला आणि सुनावणीसाठी घेण्याची विनंती केली. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी या प्रकरणावरील सुनावणीसाठी तारीख देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर शरद पवार गटाच्या वकिलांनी अजित पवार गटाचे घड्याळ चिन्ह तात्पुरते विधानसभा निवडणुकीसाठी काढून घ्यावे अशी विनंती केली. अजित पवारांनी अजून त्यांचं प्रतिवेदन न्यायालयात सादर केलेलं नाही, हे नमूद केलं. त्यावर आमच्या उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरले आहेत, असे अजित पवारांच्यावतीने सांगण्यात आलं.