महाविकास आघाडीचं जागावाटपाचा तिढा कायम असतानाच एका अफेवंन खळबळ उडवून दिली… शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत अमित शाहांना भेटल्याचं सांगण्यात आलं.
एवढंच नव्हे तर महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे बाहेर पडतील असे आडाखेही बांधले जाऊ लागले. ही चर्चा म्हणजे अफवा असल्याचं संजय राऊतांनाही सांगावं लागलं. एवढच नव्हे तर काँग्रेस नेतेही ठाकरे आमच्या सोबत असल्याचं सांगताना दिसत होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचं नातं किती घट्ट आहे हे सांगण्याची वेळ विजय वडेट्टीवारांवर आलीय. कारण घडलच तसं होतं… काँग्रेस आणि ठाकरेंच्या पक्षाची जागावाटपावरुन ओढाताण सुरु असताना संजय राऊत यांनी अमित शाहांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. त्यामुळं महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाहेर पडणार का याची जोरदार चर्चा सुरु झालीय.
तिकडं दिल्लीत काँग्रेस नेत्यांनी हायकमांडला शिवसेनेच्या या भेटीची माहिती दिल्याचंही सांगण्यात आलं. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असं काही करणार नाही असं विजय वडेट्टीवार सांगू लागले. ज्या संजय राऊतांच्या भेटीची बातमी झाली होती ते संजय राऊतही दुपारी माध्यमांना सामोरे गेले. महाराष्ट्रद्रोही भाजपशी शिवसेना कधीही हातमिळवणी करणार नाही अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली. या अफवा जाणिवपूर्वक पसरवल्या गेल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
संजय राऊतांनी कथित भेटीच्या केलेल्या इन्कारामुळं काँग्रेसच्या नेत्यांचा जीव भांड्यात पडलाय. मात्र कथित भेटीच्या वृत्तानं महाविकास आघाडीच्या तिनही पक्षात अविश्वासाची भावना निर्माण करण्यात अफवा पसरवणारे यशस्वी झालेत. पण या चर्चेनं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं हे निश्चित…