ताज्या बातम्या

आटपाडीत ओढ्याला आला नोटांचा पूर! पाचशेच्या नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड


आटपाडीमध्ये ओढय़ाला चक्क नोटांचा पूर आला आहे. पाचशे रुपयांच्या नोटा ओढय़ातून वाहून आल्याचा प्रकार घडला. या नोटा गोळा करण्यासाठी ओढ्यामध्ये नागरिकांची एकच झुंबड उडाली. पण हे पैसे कसे आले, याबाबत अद्यापि स्पष्ट झालेले नाही.

 

सांगली जिह्यातील आटपाडी शहरात आज शनिवारचा आठवडा बाजार असतो. गावातल्याच अंबाबाई मंदिराशेजारील सुख ओढा या ठिकाणी हा बाजार भरत असतो. बाजाराच्या निमित्ताने सकाळच्या सुमारास नागरिकांची ये-जा सुरू असते. नऊ वाजल्याच्या सुमारास या ठिकाणाहून बाजारासाठी आलेल्या काही नागरिकांना ओढय़ातून पाचशे रुपयांच्या नोटा वाहत असल्याची बाब निदर्शनास आली. यानंतर नागरिकांनी पाण्यामध्ये उतरून त्या नोटा खऱया आहेत का, याची चाचपणी केली. ज्यामध्ये पाचशेच्या या नोटा खऱया असल्याचे समजल्यानंतर ही बातमी वाऱयासारखी परिसरात पसरली आणि नंतर या सुख ओढ्यामध्ये नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांनी धडाधड उडय़ा घेतल्य़ा जवळपास 100 ते 200 मीटर आसपासच्या परिसरामध्ये या नोटा आढळून येत होत्या. यावेळी अनेक लोकांना पाचशेच्या दहा, पंधरा, वीस, पंचवीस आणि 50 नोटा हाताला लागल्या आहेत. दोन ते अडीच लाख रुपये लोकांनी गोळा केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 

या घटनेनंतर आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी ओढ्यातून नागरिकांना बाहेर काढून, या ठिकाणी ओढ्यात सापडत असलेल्या नोटा गोळा करण्याचे काम सुरू केल़े मात्र, या नोटा कोठून आल्या? कोणाच्या? का टाकल्या? हे अद्यापि समजू शकलेले नाही. या ठिकाणी सापडलेल्या पाचशेच्या सर्व नोटा खऱया असल्याने नागरिकांची चंगळ झाली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *