मुंबई : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती आहे. त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्धिकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन अज्ञातांनी सिद्धिकी यांच्यावर गोळीबार केल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
या गोळीबारात सिद्धिकी यांना गंभीर दुखापत झालेली आहे. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बाबा सिद्धिकी यांनी कित्येक वर्षे काँग्रेसमध्ये काम केले. काँग्रेसचे एकेकाळचे ते बडे नेते राहिले. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मुंबई विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. आज शनिवारी सायंकाळी दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्धिकी हे त्यांचे पुत्र झिशान यांच्या कार्यालयासमोर थांबलेले असताना त्यांच्यावर तीन राऊंड फायर करण्यात आले. वांद्रे पूर्व येथे ही गोळीबाराची घटना झाली.
सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करुन अज्ञात मारेकरी वेगात पळून गेले. सिद्धिकी यांच्या छातीवर एक गोळी लागल्याने सिद्धिकी रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना तत्काळ मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. निर्मल नगर पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
बाबा सिद्धिकी हे मूळचे बिहारचे… 1990 च्या दशकात मुंबईत त्यांनी निवडणुकीचे राजकारण सुरू केले. 1992 मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1997 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. बाबा सिद्दीकी 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2004 आणि 2009 मध्ये ते पुन्हा विजयी झाले. बाबा सिद्दीकी 2004 ते 2008 या काळात मंत्रीही होते.
कोण आहेत बाबा सिद्धिकी?
-बाबा सिद्धिकी राजकारणातील बडा चेहरा
-काँग्रेस पक्षाकडून त्यांनी आमदारकी भूषवली आहे
-गेली अनेक दशके त्यांनी काँग्रेस पक्षात काम केले
-परंतु मागील सहा महिन्यांपूर्वी त्यांनी दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला
-सिद्धिकी यांचा बॉलिवूडमध्येही मोठा दबदबा आहे
-त्यांच्या एका फोनवर अख्खे बॉलिवूड गोळा होता
-त्यांची इफ्तार पार्टी संपूर्ण बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहे