राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पा झाले विराजमान; वर्षा बंगल्यावर बाप्पाचे जल्लोषात स्वागत
राज्यामध्ये सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष आहे. घराघरामध्ये बाप्पा विराजमान झाला असून सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरण आहे. राजकीय नेत्यांच्या घरी देखील लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे.
मोठ्या उत्साहामध्ये गणपती बाप्पा विराजनाम झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय निवासस्थानी तसेच देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या निवासस्थानी देखील बाप्पाचे स्वागत करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी देखील गणरायाचे आगनम झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये बाप्पाचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक गणरायाची पुजा केली. तसेच आरती केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भक्तीभावामध्ये तल्लीन झालेले दिसले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील उपस्थिती होती. मोठ्या उत्साहामध्ये वर्षावर गणरायाचे स्वागत करण्यात आले.
सागर बंगल्यावर जल्लोष
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील गणरायाचे स्वागत करण्यात आले आहे. धुमधडाक्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवास्थानी गणपती बाप्पा विराजमान झाला. फुलांची भव्य आरास आणि बाप्पाची सुंदर मूर्ती मन मोहक दिसत होती. यावेळी फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत बाप्पाची आरती केली. प्रसन्नमयी वातावरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा
गणेशोत्वासाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गणेशोत्सव हा एक उत्साह आणणारा सण आहे. आज गणेश पर्वची सुरुवात होत असल्यामुळे खुशीचे वातावरण आहे. देशातील आणि जगभरातील सर्व गणेशभक्तांना मी शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातील उत्साह तर तुम्हाला दिसत आहेच. गणेशाच्या चरणी मी मागणी करेल की सर्वांना सुख समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो. तसेच आपला देश आणि आपलं राज्य महाराष्ट्र नेहमी प्रगतीपथावर राहू दे. त्याच्यासमोर जे विघ्न येईल ते दूर होऊ दे अशी मी प्रार्थना करतो,” अशा शुभेच्छा देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.