ताज्या बातम्या

श्रावण विशेषः सोन्याचा खजिना सापडलेले; पाषाण येथील स्वयंभू सोमेश्वर मंदिर


पुण्याच्या परिसरामध्ये अनेक पुरातन मंदिरं आजही आपली ओळख जपून आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शहराच्या जवळ असणाऱ्या पाषाणमधील सोमेश्वर महादेव मंदिर. सोमेश्वरवाडीमध्ये असणारे सोमेश्वर मंदिर भव्य परिसर, सुबक नक्षीकाम आणि स्वयंभू शिवलिंग यासाठी ओळखले जाते.

 

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांनी देखील येथील शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे, अशी मान्यता आहे.

 

सोमेश्वर महादेव मंदिर सुमारे 900 वर्षांपूर्वी पासून मुळा नदीची उपनदी असलेल्या रामनदीच्या काठावर आहे. या मंदिराचा शिवरायांपासून पेशव्यांच्या इतिहासापर्यंत उल्लेख आहे. पेशावाईच्या काळात या मंदिरामध्ये सोन्याचा खजिना सापडला होता. मराठ्यांचे आध्यात्मिक उपदेशक शिवरामभट चित्रस्वामी यांना मंदिराच्या आवारात पुरलेले सोन्याच्या पेशव्यांकडे दिले. पेशव्यांनी देखील या सोन्याचा उपयोग मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी केला. या मंदिराचे स्थापत्यामध्ये या प्रत्यय येतो. पेशव्यांकडून बांधण्यात आलेल्या ओंकारेश्वर मंदिर आणि या सोमेश्वर मंदिराच्या बांधकामामध्ये साम्य दिसून येते.

 

मंदिराचा परिसर भव्य असून साडेतीन एकरांचा आहे. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहे. मंदिराला गडकोटप्रमाणे तटबंदी आहे. मुख्य दगडी प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर मंदिराचा प्रसन्न करणारा भव्य परिसर दिसून येतो. प्रवेश केल्यानंतर अगदी समोर डोलेजंग अशी दीपमाळ दिसते. त्याची उंची तब्बल 40 फूट आहे. त्याखाली गणराय आणि हनुमानाची छोटीखानी देऊळं आहेत. त्याचबरोबर काही ‘स्मरणशिळा’ देखील आहेत.

 

सोमेश्वर मंदिर हे मुळा नदीची उपनदी असलेल्या राम नदीच्या किनारी हे मंदिर उभारण्यात आले आहे. सध्या मात्र ही नदी नसून तिला नाल्याचे स्वरुप आले आहे. सोमेश्वर मंदिराच्या मागे कुंड देखील बांधण्यात आलेले आहे. या दगडी कुंडाला सुंदर अशा दगडी पायऱ्या आहेत. नदीत दगडी किंवा लाकडी पाचरी मारून पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळे हे जलाशय तयार झाले आहे. या जलाशयामुळे मंदिराचे सौंदर्य आणखी खुलले आहे.

 

दगडी बांधकाम असलेल्या सोमेश्वर मंदिरावर सुबक नक्षीकाम करण्यात आले आहे. फुलांच्या आणि पानांचे कोरीवकाम करण्यात आले आहे. मंदिराचा गाभारा देखील दगडी आहे. आतमध्ये निरव शांतता आणि कमालीचा गारवा आहे. पुणे महानगर पालिकेकडून सोमेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. यावेळी मंदिरामध्ये संगमरवरी काम करण्यात आले. त्यावर सुंदर असे नक्षीकाम करण्यात आले आहे. गाभाऱ्यामध्ये स्वयंभू असे शिवलिंग आहे. शिवलिंगासमोर दगडी नंदी आहे. नंदीची झूल अतिशय कोरीव असून बारीक काम त्यावर दिसून येते. अनेक पुरातन मंदिरांपैकी एक असलेले हे पाषाणमधील सोमेश्वरवाडीचे सोमेश्वर मंदिर आपले वेगळेपण जपून आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *