खरंच झाडाला पैसे लागले तर असा विचारही आपल्या मनात येतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण भारतात असंच पैशांचं झाड आहे ते एका गावात.
जिथं प्रत्येक कुटुंब श्रीमंत आहे. प्रत्येक कुटुंबाला 75 लाख रुपये मिळतात.
हिमाचल प्रदेशमध्ये एक गाव आहे, जे हिमाचलचे सर्वात श्रीमंत गाव मानलं जातं आणि असा दावा केला जातो की उत्पन्नाच्या बाबतीत ते आशिया खंडातील 10 सर्वात श्रीमंत गावांपैकी एक आहे. मडावग असं या गावाचं नाव आहे. हे गाव हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील चौपाल तालुक्यात येते. शिमला शहरापासून सुमारे 83 किलोमीटर अंतरावर ते वसलेलं आहे.
कसं आहे पैशांचं झाड?
हा संपूर्ण परिसर सफरचंदाच्या लागवडीवर अवलंबून आहे आणि 100 वर्षे जुनी रॉयल सफरचंद जातीची फळझाडं आजही इथं आहे.
मडावग पंचायतीचे प्रमुख प्रेम डोगरा यांनी सांगितलं की, मडावग पंचायत ही समुद्रसपाटीपासून सुमारे 9000 फूट उंचीवर वसलेली असून येथील माती सफरचंद उत्पादनासाठी अतिशय योग्य आहे. त्यामुळे येथील बागायतदार उच्च दर्जाचे सफरचंद विकून चांगले उत्पन्न मिळवू शकतात. येथील प्रत्येकजण आपल्या उत्पन्नासाठी सफरचंद बागेवर अवलंबून आहे.
त्यांच्या पंचायतीमध्ये 7 वॉर्ड आहेत, ज्यामध्ये 480 हून अधिक कुटुंबे राहतात. प्रत्येक कुटुंब सफरचंद विकून दरवर्षी 75 लाख रुपयांहून अधिक कमावते.
वर्षभर टिकणारी खास रॉयल सफरचंद
प्रेम डोग्रा यांनी सांगितले की, या भागातील सफरचंदाची रॉयल विविधता त्याच्या चव आणि उत्कृष्ट शेल्फ लाइफसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आजही या गावात 100 वर्षे जुनी रॉयल सफरचंद प्रकारची फळझाडे आहेत. रॉयलशिवाय सफरचंदांच्या 50 हून अधिक जातींचे येथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं.
त्यांनी सांगितलं की सफरचंदाची खास रॉयल जाती वर्षभर नीट साठवून ठेवली तर ते खराब होत नाही आणि त्याची चव, रस आणि गोडपणात विशेष फरक पडत नाही. यामुळेच येथील सफरचंदांना देश-विदेशात मोठी मागणी आहे, त्यामुळे बागायतदारांना त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव आणि नफा मिळतो.