‘या’ गावातील प्रत्येक कुटुंबाला मिळाले 58 लाख रुपये; काही वर्षांपूर्वी केलं होतं एक छोटं काम
कोणी अचानक 58 लाख रुपये दिले, तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पण त्यासाठी नशीबही तितकं बलवत्तर असलं पाहिजे. पण दक्षिण कोरियामधील एका गावात खरंच अशीच घटना घडली आहे.
या गावातील प्रत्येक कुटुंबाला तब्बल 58 लाख रुपये मिळाले आहेत. ही गोष्ट गावासह एका व्यावसायिकाची आहे. ज्याने आपल्या संपत्तीने गावकऱ्यांचं नशीबच पालटलं. त्याने गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी 58 लाख रुपये देत असल्याची घोषणा केली. अचानक मिळालेल्या या संपत्तीमुळे गावकऱ्यांचा आनंदही गगनात मावेनासा झाला होता. कारण एका क्षणात त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदललं होतं. प्रत्येक घरात पैशांचा पाऊसच पडला आहे.
प्रत्येक कुटुंबाला 58 लाख देण्याचा निर्णय
दक्षिण कोरियातील अब्जाधीश व्यावसायिक ली जोंग क्यून यांनी आपलं बालपण गेलेल्या गावातील प्रत्येक कुटुंबाला 58 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. जोंग 82 वर्षांचे आहेत आणि एका प्रॉपर्टी डेव्हलपमेंट कंपनीचे मालक आहेत. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काही महिन्यांपूर्वी त्यांनी ही घोषणा केली होती. अखेर या सर्व कुटुंबाना पैसा मिळाला आहे. सनचिओन सिटी येथील एका छोट्या गावात त्यांचं बालपण गेलं होतं. त्याच गावासाठी त्यांन ही घोषणा केली.
गावकरी भावूक
ली जोंग क्यून यांनी जेव्हा पैसे देण्याची घोषणा केली तेव्हा गावकरी भावूक झाले होते. त्यांनी गावातील प्रत्येक कुटुंबाला 58 लाख रुपये दान करणार असल्याचं जाहीर केलं होतं. माहितीनुसार, गावात 280 पेक्षा जास्त कुटुंब आहेत. या सर्वांना ली जोंग क्यून यांनी 58 लाख रुपये दिले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या त्यावेळच्या शाळकरी मित्रांनाही मोठ्या भेटवस्तू दिल्या आहेत. कोरिअन टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जवळपास एक वर्षापूर्वी ही घोषणा झाली होती. या घोषणेची चर्चा संपूर्ण जगभरात होती.
अब्जाधीशांच्या यादीत आहेत ली जोंग क्यून
दुसऱ्या एका रिपोर्टनुसार, या उद्योगपतीने 1500 कोटी रुपयांहून अधिक दान केले आहेत. त्य़ांच्या या दानशूरपणाने सर्वांची मनं जिंकली आहेत. दक्षिण कोरियाच्या अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट असलेल्या ली जोंग क्यून यांची एकूण संपत्ती 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या ली जोंग क्युन यांना बालपणी गरिबीचा सामना करावा लागला. गावकऱ्यांच्या मदतीने ते शहरात गेले आणि आज एक यशस्वी उद्योजक आहेत. ज्यांनी स्वप्न पाहणे कधीच सोडले नाही त्यांच्यासाठी त्यांची कथा प्रेरणास्त्रोत आहे.